गेले दीड -दोन वर्षे, गोव्यात टॅक्सी व्यावसायिकांना अनेक बिकट परिस्थितीशी सामना करावा लागला.कुटुंबाचा चरितार्थ चालविणे कठीण असताना बँकांचे थकलेले हप्ते,वाहनाचा विमा व आंतरराज्य परवाने आदी खर्च करणे शक्य झाले नाही.त्यात वाहतूक खात्याने मीटर सक्ती फर्मान काढले व आणखीन संकटात टाकले.मुख्यमंत्र्यांनी चतुर्थीची भेट मीटरच्या स्वरूपात देण्याची घोषणा केली व आशिर्वाद मिळवले,प्रत्यक्षात नाहीच,किमान दिवाळीपूर्वी तरी भेट द्यावी अशी मागणी टॅक्सी व्यवसायिकातून केली जात आहे.
वास्तविक टॅक्सी व्यावसायिक आर्थिक संकटात असूनही सरकारने कोर्टाच्या निकालाची कार्यवाही सुरू केली व टॅक्सी व्यावसायिकांचे धाबे दणाणले.त्या आदेशाची कार्यवाही कठीण बनली होती.टॅक्सी संघटनेने अनेक आजर्वे,विनंती करून किंचित यश मिळवले होते.एकरकमी अठरा एकोणीस हजार रुपये भरून मीटर बसविल्यासच गाड्याचे पासिंग नूतनीकरण केले जात असल्याने काहींनी बँकांकडून कर्ज तसेच काहींनी भरमसाठ व्याजदरात पैसे घेतले व मिटर बसविले होते. कित्येकांनी गाड्याचे नूतनीकरण करून घेतले होते,अशी कैफियत व्यावसायिक प्रदीप वस्त यांनी मांडली. मात्र अद्याप टॅक्सी व्यावसायिकांचे सरकारने पैसे न दिल्याने हरमलमधील टॅक्सी व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
गोमंतकीय लोकांचा आवडता सण म्हणजे श्री गणेश चतुर्थी. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी चतुर्थीची भेट म्हणून मोफत मिटर वा मीटरचे पैसे खात्यात जमा करण्याचे गोड आश्वासन दिले होते.गणेश चतुर्थी उलटून गेल्यास महिना उलटला तरीही टॅक्सी व्यावसायिकांना पैशाचा लाभ झाला नाही, किमान दिवाळीच्या उत्सवापूर्वी तरी आश्वासन पूर्ण करावे अशी मागणी टॅक्सी व्यवसायिकनि केली आहे.
तरी मांद्रे मतदारसंघाचे आमदार तथा पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन दयानंद सोपटे यांनी चांगले सहकार्य केले होते.आमदार सोपटे यांनी जातिनिशी लक्ष घालून मुख्यमंत्री व वाहतूक मंत्र्यकडून आश्वासन पूर्ती करावी अशी मागणी केली जात आहे.