हिंदु जनजागृती समितीची उत्तर गोव्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकार्यांकडे मागणी
*प्रदूषणकारी, तसेच देवतांची विटंबना करणार्या फटाक्यांवर बंदी घाला : चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी कायम ठेवा !*
पणजी, १ नोव्हेंबर – फटाक्यांमुळे वायूप्रदूषण आणि ध्वनीप्रदूषण होते. फटाक्यांमुळे आतापर्यंत अनेक अपघात, तसेच अनेकांना गंभीर शारीरिक दुखापती झाल्या आहेत. त्यामुळे या प्रदूषणकारी फटाक्यांवर कायमची बंदी घालण्यात यावी. सध्या भारतात कोरोनाची दुसरी लाट निवळते आहे, तसेच पुन्हा तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोरोना विषाणू हा प्रामुख्याने श्वसनसंस्थेवर आक्रमण करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व प्रकारच्या फटाक्यांवर बंदी घालणे, हिताचे आहे, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. गोपाळ पार्सेकर यांच्याकडे १ नोव्हेंबर या दिवशी एका निवेदनाद्वारे करण्यात आले. निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये सर्वश्री केशव चोडणकर, प्रमोद तुयेकर, भारत हेगडे, अशोक हळदणकर आणि सौ. प्रतिभा हळदणकर यांचा समावेश होता.
निवेदतान पुढे म्हटले आहे की, फटाक्यांच्या वेष्टनांवरील हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांच्या चित्रांमुळे देवतांचा सर्रास अवमान होतो. हे फटाके फोडल्यावर त्यांवरील देवता आणि राष्ट्रपुरुष यांच्या चित्रांच्या चिंधड्या होऊन त्या जागोजागी पडलेल्या आढळतात. या चिंधड्या अनेकांच्या पायाखाली, केरात, चिखलात, गटारांत पडलेल्या निदर्शनास येतात. त्यामुळे देवतांची विटंबना आणि राष्ट्रपुरुषांचा अवमान होऊन कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात, तसेच राष्ट्रीय अस्मितांवरही आघात होतात. याविषयी हिंदु जनजागृती समिती वर्ष २००५ पासून वैध मार्गाने जनजागृती चळवळ राबवत आहे. चीनच्या कपटनीतीमुळे भारत-चीन सीमेवर गेले काही महिने तणाव निर्माण झाला आहे. चीनने भारताच्या भूमीत अतिक्रमण केले, तसेच सैन्यावर आक्रमणही केले होते. या पार्श्वभूमीवर यंदाही चिनी फटाक्यांवरील बंदी कायम रहावी, यासाठी भारत सरकारने जागृती करावी. चिनी फटाक्यांमध्ये विषारी घटकांचे प्रमाण अत्यधिक असते. याच्या निर्मितीसाठी ‘पोटॅशियम क्लोराइड’ आणि ‘पोटॅशियम परक्लोराइड’ यांचे रासायनिक मिश्रण वापरले जाते. भारतात या रासायनिक पदार्थांच्या वापरावर बंदी आहे.
*आपला विश्वासू,*
*डॉ. मनोज सोलंकी, राज्य समन्वयक*
हिंदु जनजागृती समितीकरता,
संपर्क : ९३२६१०३२७८