म्हापसा दि. 1 ( प्रतिनिधी )
म्हापसा मरोड येथील एका दुकानाला आग लागून सुमारे पन्नास लाखांचे नुकसान झाले. ही घटना आज पहाटे 1.30 च्या सुमारास घडली.
म्हापसा अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार मरोड म्हापसा येथील कॉसमॉस इमारतीच्या तळ मजल्यावर असलेल्या आलेमा स्टोर्स या भेटवस्तू व खेळण्याच्या तसेच प्लास्टिक वस्तू विक्रीच्या दुकानाला रात्रौ आग लागली, या आगीत दुकानातील सर्व सामान जळून खाक झाले. म्हापसा अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळेत आग आटोक्यात आणली, अन्यथा आग पसरून इमारतीतील इतर दुकानांना धोका पोहचला असता. आग नक्की कशामुळे लागली याचे कारण समजू शकलेले नसून आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हापसा पोलिसांना पुढील तपास करण्यास सांगितले आहे.
दरम्यान आज पहाटे गिरी येथे महामार्गांवर पणजीच्या दिशेने जाणाऱ्या GA 04 T 9495 या चालत्या ट्रकला अचानक आग लागली. या आगीत ट्रक मधील सामनासह सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले. ट्रक चालकाने चालत्या ट्रकमधून उडी मारल्याने त्याचा जीव वाचला. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.
फोटो….. 1) म्हापसा येथे दुकानाला लागलेली आग 2) आग आटोक्यात आणताना म्हापसा अग्निशामक दलाचे जवान……….. (रमेश नाईक )