हरमल प्रतिनिधी
पालये पंचायत क्षेत्रातील उग्र अश्या पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यास नागरिकांनी सहकार्य केले तसेच पंच सदस्यांनी पाठपुरावा केला त्यामुळे पाणी समस्या दूर होण्यास मदत झाली.आगामी निवडणुकीत जनतेची सेवा करण्याची संधी पुन्हा एकदा द्यावी असे आवाहन मांद्रे मतदारसंघाचे आमदार तथा जिटीडीसीचे चेअरमन दयानंद सोपटे यांनी केले.
भोम पालये येथील सार्वजनिक कुपनलिकेच्या उदघाटनसमयी आमदार सोपटे बोलत होते.पालये गावांत भोम,मिरझलवाडा,किरणपाणी व भंडार वाडा भागांत मिळून सात कूपनलिका प्रमुख जलवाहिनीला जोडल्याने,ह्या प्रमुख भागात पाणी समस्या भेडसावणार नाही.परंतु अजूनही पाणी टंचाईच्या प्रश्नांवर समस्या दूर करण्यासाठी आपले सदोदित प्रयत्न असतील त्यासाठी आपल्या समस्या निदर्शनास आणून द्याव्यात.पुढील महिन्यात पेडणे आयटीआयनजीक 8 हजार चौ मीटर जागेत स्वतंत्र पाणी पुरवठ्याची सोय 65 कोटी रुपये खर्चून मंजूर झाली आहे त्यामुळे मतदारसंघातील नागरिकांची समस्या सुटणार आहे,असे आमदार सोपटे यांनी सांगितले.याकामी राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या सहकार्याने ह्या समस्या सोडविण्यास बळ प्राप्त झाले,असल्याचे आमदार सोपटे म्हणाले.
मुख्यमंत्री डॉ सावंत यांचे मांद्रेवासीयाकडून अभिनंदन—-
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या यशस्वी नेतृत्वाखाली सरकारने 1 नोव्हेंबरपूर्वी खड्डेमुक्त रस्त्याच्या आश्वासनाची पूर्तता केल्याने मांद्रे मतदारसंघातील तमाम मतदार व नागरिकांच्यावतीने मुख्यमंत्री डॉ सावंत यांचे अभिनंदन असल्याचे आमदार तथा जिटीडीसीचे चेअरमन दयानंद सोपटे यांनी व्यक्त केले.
मांद्रेतील जनतेने निवडून दिलेला लोकप्रतिनिधी जनतेबरोबर असून त्यांच्या समस्या मार्गी लावणे आपले प्रथम कर्तव्य आहे.अजूनही काही समस्या असतील त्या दूर करण्यासाठी आपले सदोदित प्रयत्न चालू आहेत.पेडण्यातील तुये इलेक्ट्रॉनिक सिटी, तुये हॉस्पिटल,पाणी प्रकल्प व वीज सबस्टेशन हे चारही प्रकल्प 19 डिसेंबर पूर्वी मार्गी लागतील ह्याची हमी मुख्यमंत्री डॉ सावंत यांच्यावतीने देत असल्याचे आमदार सोपटे यांनी सांगितले.आगामी निवडणुकीत पुन्हा एकवार विकास करण्याची संधी द्याल.मांद्रे मतदारसंघातील नऊही पंचायत क्षेत्राचा विकास करण्यास आपण बांधील असल्याचे आमदार सोपटे यांनी सांगितले. यावेळी पंचसदस्य सागर तिळवे यांनी भोम पंचायत क्षेत्रातील पाणी समस्या सोडविण्यास पुढाकार घेतलेले आमदार,सरपंच, पंच तसेच जमीन मालकांनी सह्यय केल्याबद्दल धन्यवाद दिले. आमदार दयानंद सोपटे व आपले यांचे कार्य पसंत पडल्यास पुन्हा निवडून देण्याची संधी द्यावी,असे आवाहन पंचसदस्य तिळवे यांनी केले.यावेळी सरपंच उदय गवंडी,पंच तथा भाजप मंडळ अध्यक्ष मधु परब,पंच प्रशांत नाईक,नागरिक प्रकाश परब,भिसो मांद्रेकर,ज्ञानेश्वर पालयेकर,चंद्रकांत तिळवे,पत्रकार राजेश परब आदी उपस्थित होते. शेवटी मंडळ अध्यक्ष तथा पंच मधु परब यानी आभार मानले.
फोटो
पालये—-पालये भोम पंचायत प्रभागात कूपनलिकेचे उदघाटन करताना आमदार दयानंद सोपटे सोबत सरपंच उदय गवंडी,पंच सागर तिळवे,पंच प्रशांत नाईक,पंच तथा भाजप मंडळ अध्यक्ष मधु परब,प्रकाश परब,चंद्रकांत तिळवे, ज्ञानेश्वर पालयेकर,राजेश परब व ग्रामस्थ