दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. नरक चतुर्दशी हा दिवाळीच्या दिवसांतील एक आहे. दर वर्षातील आश्विन कृष्ण चतुर्दशीस म्हणजेच अश्विन कृष्ण महिन्याच्या चौथ्या दिवशी नरक चतुर्दशी येते. या दिवशी पहाटे लवकर उठून शरीराला उटणे लावतात त्यानंतर संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे असते. तेव्हाच आपल्या आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल.
नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी सुवासिक उटणे, तेलाचे मर्दन लाऊन स्नान केले जाते, त्यास अभ्यंगस्नान असे म्हणतात. या दिवशी अभ्यंगस्नानानंतर यमासाठी नरकात म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील स्वच्छतागृहात दीपदान करण्याची प्रथा आहे, असेही मानतात.
नरक चतुर्दशी मागील आख्यायिका :
नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासुरवधाची आख्यायिका खूप प्रचलित आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलमी राजवटीतून सोडवले होते, असे मानतात.
पुराणानुसार नरकासुर हा एक प्रसिद्ध असुर होता, ज्याला पृथ्वीच्या गर्भातून उत्पन्न विष्णुपुत्र म्हणून ओळखल्या जायचे. हा वराह अवतार वेळी जन्मला होता, जेव्हा विष्णूने पृथ्वीचा उद्धार केला होता.
जेव्हा लंकापती रावणाचा वध झाला तेव्हा पृथ्वीच्या गर्भातून नरकासुराचा जन्म झाला, नरकासुराचा जन्म त्याचं स्थानी झाला होता जिथे जानकी म्हणजेच सीतेचा जन्म झाला. त्यामुळे राजा जनक यांनी नरकासुर १६ वर्षांचा होत पर्यंत त्याच पालन पोषण केलं. त्यानंतर पृथ्वी त्याला विष्णूजवळ घेऊन गेली आणि मग विष्णूने त्याला प्राग्ज्योतिषपूर या राज्याचा राजा बनविले. नरकासुर हा मथुरेच्या राजा कंस याचा असुर मित्र होता. विदर्भाची राजकुमारी माया हिच्याची त्याचा विवाह झाला, त्यावेळी भगवान विष्णूने त्याला एक दुर्भेथ रथ दिला.
काही दिवसांपर्यंत तर नरकासुर व्यवस्थितपणे राज्याचा कारभार सांभाळत होता. पण बाणासुराच्या संगतीत पडून तो दुष्ट झाला. त्यामुळे वशिष्ठ यांनी नरकासुराला विष्णूच्या हाती मारले जाण्याचा शाप दिला.
या श्रापापासून वाचण्याकरिता एकदा नरकासुराने कठोर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले व ‘अवध्यत्वा’चा म्हणजेच कुणाकडूनही त्याचा वध होणार नाही असा वर मागून घेतला. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले. नरकासुराने अश्या एकूण १६,१०० स्त्रियांना पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले. त्याने अगणित संपत्ती लुटली व अश्याच हावेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छ्त्र देखील बळकावले. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्व व मानवांना त्रासदायक झाला होता.
अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्राग्ज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती. ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी, अग्नी, पाणी इत्यादींनी वेढलेली होती. या दुर्जय राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली. कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला. नरकासुरवधाने देवादिकांना, तसेच प्रजेला आनंदी केले. नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांची कुटुंबे आता स्वीकारणार नाहीत, हे जाणून कृष्णाने त्या १६,१०० कन्यांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली.
कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून नरक चतुर्दशी साजरी करतात.
असं म्हणतात की, नरकासुराचा वध करताना कृष्णाच्या शरीरावर त्याच्या रक्ताचे शिंतोडे उडाले होते, हेच रक्त साफ करण्यासाठी श्रीकृष्णाने तेलाने स्नान केले होते. तेव्हापासूनचं त्यादिवशी अभ्यंगस्नान करण्याची परंपरा सुरु झाली.
नरकासुराच्या वधानंतर त्याची आई भूदेवी म्हणजेच पृथ्वी हिने घोषणा केली की त्यांचा मृत्यूवर शोक करू नये तर त्याच्या मृत्यूला एखाद्या उत्सवाप्रमाणे आनंदाने साजरा करावे.
नरक चतुर्दशीचा सण आपल्याला हा संदेश देतो की, या संपूर्ण समाजाचा चांगुलपणा कुठल्याही व्यक्तीच्या व्यक्तिगत स्वार्थापेक्षा नेहमी प्रबळ असतो.