म्हापसा दि. 10 ( प्रतिनिधी )
अनियमित व अपुऱ्या पाणीपुरवठायामुळे वैतागलेल्या वागातोर कायसूव शापोरा वासियांनी नळाद्वारे पाणी पुरवठा होत नसल्याच्या निषेधार्थ वागातोर येथे रस्त्यावर ठाण मांडून रस्ता रोको केला, जोपर्यत पाणी पुरवठा होत नाही तोपर्यंत रस्ता रोको चालू रहाणार असा इशारा देत दुपारी उशिरापर्यत त्यांचा रस्ता रोको चालू होता. सुमारे दोनशेहून अधीक ग्रामस्थ या रस्ता रोकोत सहभागी झाले होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात हणजूण पोलीस तैनात होते.
हणजूण कायसूव वागातोर वासियांना गेल्या काही वर्षांपासून नळाद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठायची समस्या भेडसावत होती, गेल्या आठवड्यात म्हापसा पाणीपुरवठा कार्यालयावर मोर्चाही नेण्यात आला होता, त्यावेळी पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास रस्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला होता, नळाद्वारे पाणीपुरवठा होत नसलेल्या काही ठिकाणी टँकर द्वारे पाणी पुरवठा केला जात होता पण गेल्या दोन दिवसापासून टँकर नादुरुस्त असल्याचे कारण देऊन खात्याने पाणी पुरवठा करण्याचे बंद केल्याने येथील ग्रामस्थांचा उद्रेक झाला आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पाणी पुरवठायसाठी अनेक वेळा पत्रव्यवहार करण्यात आला, सर्व सबंधिताकडे तक्रार करण्यात आली व प्रत्यक्ष भेटही घेण्यात आली पण प्रत्येक वेळी फक्त आश्वासन देण्यात आले. अभयत्यांना भेटल्यानंतर दोन दिवस काही प्रमाणात पाणी पुरवठा होतो नंतर पुन्हा येरे माज्या मागल्या. आम्हाला फुकट पाणी नको विकतच द्या, पण द्या. पाणी पुरवठा होत नसताना भरमसाठ बिले मात्र पाठवली जातात. सरकारने राज्यात पाणी आहे की नाही ते प्रथम जाहीर करावे, जगप्रसिद्ध ठिकाण असून या ठिकाणी पाणी नाही याचे सरकारला काही नाही. येथील पाणी पुरवठा करणाऱ्या वाहिन्या विस ते चाळीस वर्षा पूर्वीच्या आहेत, त्या बदलण्याची गरज आहे कारण काही ठिकाणी त्या ब्लॉक झाल्यात तर काही ठिकाणचे व्हॉल्व लिकेज आहेत त्यांची तक्रार करूनही दुरुस्ती होत नाही. जळवाहिन्यांचे जाळे ( ले आऊट प्लॅन ) अभियंत्यांनाच माहित नाही त्यामुळे काही व्हॉल्व ऑपरेटच करण्यात येत नाहीत, येथील अभियंते तसेच लाईनमन यांची त्वरित बदली करण्याची गरज आहे अशी तक्रार वजा माहिती या ग्रामस्थानी पत्रकारांकडे बोलताना दिली.
येथील ग्रामस्थांचे नेतृत्व पंचसदस्य सुरेंद्र गोवेकर, पंचसदस्य शीतल दाभोळकर, सिद्वेश्वर देवस्थानचे सचिव ऍड. विष्णू नाईक, समाजसेवक मायकल मेंडोसा यांनी केले.
फोटो……… पाणी पुरवठायच्या निषेधार्थ वागातोर येथे ग्रामस्थानी केलेला रास्ता रोको……. ( रमेश नाईक )