आघाडा
आघाडा ही वनस्पती पावसाळ्यात उगवते आणि अगदी रस्त्याच्या कडेला सहजपणे उपलब्ध होते. हे झुडूप एक ते तीन फूट उंचीपर्यंत वाढते.
आघाड्यात पांढरा, लाल व पाणअघाडा असे तीन प्रकार आहेत. या वनस्पतीच्या पानांचा मंगळागौरीच्या पूजेतील पत्रींमध्ये समावेश असतो.
झाडाच्या काड्या दांत घासण्यासाठी म्हणून उपयोगी पडतात.
दांतदुखी, मस्तकरोग, कफ, रातांधळेपणा, कावीळ, पोटदुखी, खोकला, इत्यादी रोगांवर. दात दुखत, हलत असतील तर आघाड्याच्या काड्यांचा व पानांचा रस दातांना चोळतात.
पोटदुखीवर आघाड्याची चार-पाच पाने चावून खातात किंवा पानांचा रस काढून पितात.. पित्त झाल्यास आघाड्याचे बी रात्री ताकात भिजत घालून सकाळी ते वाटून रुग्णाला दिल्यास पित्त बाहेर पडते किंवा शमते. त्यानंतर तूपभात खाणे श्रेयस्कर असते.
खोकला व कफ खूप झाला असेल, कफ बाहेर पडत नसेल, तोंडात चिकटून राहत असेल तर आघाड्याची झाडे मुळासकट उपटून ती जाळून त्याची केलेली राख थोडी थोडी मधात घालून त्याचे चाटण रुग्णाला देतात.. त्यामुळे कफ पातळ होऊन तो बाहेर पडतो व खोकलाही कमी होतो. खोकला झाल्यास आघाड्याचे चूर्ण व मिरी समभाग घेऊन मधातून चाटण देतात. खोकला व कफ यामुळे ताप आला असेल तर आघाड्याच्या पंचांगाचा काढा मधातून देतात.
सर्दीमुळे खोकला, पडसे झाल्यास, नाक चोंदल्यास, नाकाची आग होत असल्यास, नाकाचे हाड वाढल्यास आघाड्याचे बी घेऊन त्यात सैंधव, मेंदीचा पाला व जाईचा पाला समभाग घालून वाटतात. त्यात त्याच्या अर्ध्या प्रमाणात तिळाचे तेल घालून ते निम्मे आटवतात. हे तेल दिवसातून दोन-तीन वेळा नाकात घातल्यास सर्दी आटोक्यात येते..
आघाड्याच्या तुऱ्यांपासून वा मुळ्यांपासून विंचवाची विषबाधा, डोळे येणे आदींवर उपयोगी पडणारी अन्य औषधे बनतात.
मानवी शरीरातील मूत्रवाहिनी, मूत्रपिंड यामध्ये बारीक काटे असणारे मुतखडे- युरिनरी स्टोन निर्माण होतात, त्यामुळे संबंधित रुग्णास पाठीत व कंबरेच्या भागात विलक्षण वेदना होतात. अशा वेळेस आघाड्याच्या पानांचा रस प्राशन केल्यास एक-दोन दिवसांत मुतखड्याचे बारीक कण विनासायास बाहेर पडतात आणि रुग्णाला बरे वाटते.