मांद्रेचा विशिष्ट्यपूर्ण भजनी सप्ताह

.

मांद्रेचा विशिष्ट्यपूर्ण भजनी सप्ताह

मांद्रेचे ग्रामदैवत श्री भगवती सप्तेश्‍वर प्रमुख पंचायतनचा सुप्रसिध्द भजन सप्ताह आज साजरा होत आहे.
राज्याला मोठी भजन परंपरा लाभलेली आहे. उत्सव , सण पंरपरा जपताना गोमंतकीयांनी भजनकलेचा समृध्द वारसा जपलेला आहे. मांद्रे गावातील भजन सप्ताह म्हणजे भक्तीची ठेव आहे. आषाढी, कार्तिकीला पंढरपूरात विठ्ठलाचा मोठा सोहळा संपन्न होतो. वारकरी श्रध्देने विठुरायाच्या दर्शनासाठी वारी करत पंढरपूरला जातात . वारकऱ्यांना जे भक्तीचे सुख आणि समाधान लाभते तेच सुख आणि समाधान मांद्रेतील जनतेला श्री भगवती सातेश्वर चरणी भक्तीची सेवा रूजू करताना मिळते. या पंचायतनात श्री सप्तेश्वर, श्री भगवती, श्री रवळनाथ, श्री नारायण, श्रीरामपुरुष अशी मंदिरे आहेत.
सप्ताहनिमित्त कार्तिकी एकादशीच्या रात्री पारकरी मंडळांतर्फे प्रसिध्द गायक कलाकारांच्या मैफिली आयोजित केल्या जातात. तसेच चित्ररथ मिरवणूकही होते. गावात वाड्यावाड्यावर मंदिरे आहेत. पण ग्रामदेवाचा उत्सव हा भव्यदिव्य असा असतो. देवस्थानात दसरोत्सव, शिमगोत्सव, जत्रोत्सव आदी अनेक उत्सव साजरे केले जातात. एकादशी सप्ताहादिवशी लोकांच्या उत्साहाला पारावर राहत नाही. आबालवृध्द भजनात दंग होतात.
कार्तिक एकादशी उत्सवाच्या अखंड भजनी सप्ताहाला यावर्षी कार्तिकी चतुर्थीला दुपारी १२ वा. श्री भगवती सप्तेश्‍वर मंदिरात धार्मिक विधींनिशी सुरुवात झाली. या दिवशी “नंदादीप” प्रज्वलित करून श्री भगवती मंदिर सभागृहात ठेवण्यात येतो. त्यानंतर साळगांवकर पारकरी मंडळातर्फे भजन दिंडी मंदिरात येते. देवीचे दर्शन झाल्यावर भजनदिंडी नंदादीपाला प्रदक्षिणा घालून तेथे स्थिरावते व नंतर तीन – साडेतीन तास या मंडळातर्फे भजनदिंडी होते. याप्रमाणे मेस्त समाज दांडोसवाडा, मधलामाज, आस्कावाडा, आश्‍वे, देऊळवाडा, जुनसवाडा या पारकरी मंडळांतर्फे क्रमवारीनुसार दिंडी-भजन अखंडपणे सुरू असते. दररोज सायंकाळी “दीपमाळ” साजरी होते.
एकादशीच्या रात्री मेस्तवाडा मंडळातर्फे श्री विठ्ठल रखुमाईचा चित्ररथ तर देऊळवाडा, आस्कावाडा, मधलामाज यांच्यातर्फेही देवदेवता अथवा संतांची चित्ररथ मिरवणूक होते. गायनाच्या मैफिली रात्रभर सुरू असतात. यादिवशी गोव्यातील तसेच गोव्याबाहेरील भाविक श्रींची खणा नारळाने ओटी भरून आशीर्वाद घेतात. सप्ताहात नंदादीपासमोरील भजनात खंड पडता कामा नये, ही परंपरा आजही कायम आहे. नंदादीपही सप्ताहाची सांगता होईपर्यंत अखंडपणे पेटत ठेवला जातो. या भागात पर्जन्यवृष्टी न झाल्याने दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण झाली. सर्वांवर संकट ओढवले. त्यामुळे रोगराई वाढली. गुरे मरू लागली. मृग नक्षत्र उलटले तरी पाऊस काही झाला नव्हता, त्यामुळे लोकांचे हाल होऊ लागले. म्हणून गावातील लोकांनी ग्रामदैवत श्री भगवती सप्तेश्‍वरासमोर संकट दूर करण्यासाठी साकडे घातले आणि कृपाशीर्वाद लाभावा, अशी प्रार्थना केली. या ठिकाणी अखंड भजनी सप्ताह करण्यात येईल, असे लोकांनी गाऱ्हाणे घातले. भाविकांच्या हाकेला देव पावला. समाधानकारक पाऊस पडला. शेतकऱ्यांनी पेरणी केली आणि दैवतांना दिलेल्या शब्दाप्रमाणे आषाढी एकादशीला २४ तासांचा भजनी सप्ताह सुरू केला. त्यावर्षी पीकही भरघोस आले. त्यामुळे दरवर्षी हा सप्ताह होऊ लागला. काही वर्षांनी आषाढीऐवजी हा सप्ताह कार्तिक महिन्यात सलग सात दिवस साजरा करण्यात येऊ लागला. पावसाळ्यात सप्ताह साजरा करण्यात अडचण येऊ लागली. त्यामुळे देवाकडे साकडे घालून सप्ताह कार्तिक एकादशीला साजरा करण्याचे ठरले. भात शेतीची कामे उरकून सप्ताहाला पुरेसा वेळ लोकांना देता येऊ लागला. या सप्ताहाला गेल्या दीडशे वर्षांत भव्यदिव्य स्वरूप प्राप्त झाले.
सप्ताहानिमित्ताने संपूर्ण गाव एकत्र येतो. द्वादशी दिनी संध्याकाळी सर्व पारकरी मंडळी नंदादीपासमोर एकत्र जमतात. भजन, आरत्या सादर करतात. नंतर गाऱ्हाणे होते आणि सप्ताहाची सांगता होते.
यंदा एकादशीच्या रात्री ९.३० वाजता देऊळवाडा पारकरी मंडळातर्फे पुणे येथील मृदुला तांबे आणि सौरभ काडगावकर यांची मैफल होणार आहे. आस्‍कावाडा पारकरी मंडळातर्फे रात्री १०.३० वाजता ईश्वर घोरपडे (पुणे) यांच्‍या गायनाची मैफल आयोजित केली आहे. रात्री १० वाजता मधलामाज पारकरी मंडळातर्फे अजिंक्य पोंक्षे आणि नहुष लोटलीकर यांची मैफल होणार आहे. याशिवाय साळगावकरवाडा पारकरी मंडळातर्फे श्री भगवती मंदिरात नंदादीपासमोर मैफल होणार आहे. तसेच मेस्त समाज पारकरी मंडळातर्फेही गायनाचा कार्यक्रम होणार आहे. शिवाय जुनुसवाडाकडूनही मंदिरात मैफल होणार आहे.
– साईसमर्थ शेट मांद्रेकर

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें