सब्जा
सर्वत्र होऊ शकणारे गुळगुळीत पानांचे तुळस वर्गातील सुगंधी झुडूप. या झाडाचे पंचांग म्हणजे सर्व भाग पान, खोड, मूळ किंवा बिया औषधी असतात. तुळशीएवढेच झाड होते. मंजिऱ्यांमध्ये असलेल्या बियांना सब्जा असे म्हणतात. तुळशीच्या बीप्रमाणेच पण आकाराने थोडे मोठे असलेले सब्जा रात्री पाण्यात भिजवून सकाळी दूध-साखर घालून घेतल्यास उष्णतेचे विकार कमी होतात. हॉटेलमध्ये मिळणाऱ्या फालुदामध्ये सब्जाचा वापर करतात. थकवा आल्यास व मेंदूस उत्तेजक म्हणून पानांचा अंगरस वापरतात. खोकला झाल्यास पानांचा अंगरस मधातून घेतल्यास ढास थांबते. कोरडा खोकला व कफ पडण्याचा त्रास कमी होतो. पोटदुखी, अजीर्ण झाल्यास पानांचा रस घेतल्याने बरे वाटते. जंतसुद्धा मरतात. तसेच कान दुखणे, दात ढिले होऊन हिरडय़ा दुखणे, जुन्या तापात अंगदुखणे इ.वर पानांचा रस उपयुक्त आहे. अनेक प्रकारच्या त्वचारोगांवर पानांचा रस चोळल्यास हे रोग बरे होतात.