कळंगुटचे आमदार मायकल लोबो हे गोव्यातील पाब्लो एस्कोबार आहेत हे पुन्हा एकदा सांगितले गेल्याने सिद्ध झाले आहे, भाजपा सरकारचे नाव बदनाम करणाऱ्या या पाब्लो एस्कोबारला मंत्री मंडळातून काढून टाकावे व चौकशी बसवावी अशी मागणी करीत मायकल लोबो यांच्या संपत्तीचची व त्यांच्या व्यवसायाची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, व प्रवर्तन निदेशालय या खात्यानी दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी कळंगुटचे माजी आमदार तथा काँग्रेसचे नेते आग्नेल फर्नाडिस यांनी पत्रकार परिषदेत केली.
कळंगुट येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेला त्यांच्या सोबत कळंगुटचे माजी सरपंच जोसेफ सिक्वेरा, विद्यमान पंचसदस्य अँथोनी मेनेझीस, कळंगुट काँग्रेस गटाध्यक्ष बेनेडिक्ट उपस्थित होते.मायकल लोबो हे किनारी भागातील किंगपीन आहेत असा आरोप यापूर्वी आमदार रोहन खंवटे यांनीही केला होता आता आमदार विनोद पालयेकर यांनी करून त्यावर शिक्का मोर्तब केला आहे. काँगेसच्या वरिष्ठाना या बाबत कळवणार असून केंद्रीय अंमलीपदार्थ विरोधी खाते, प्रवर्तन निदेशालय व संबंधित खात्याकडे लोबो यांच्या विरोधात तक्रार करण्यात येणार असल्याचे आग्नेल फर्नांडिस यांनी सांगितले.
कलंगुट विभागात होणाऱ्या अंमली पदार्थ व्यवसायावर नियंत्रण मायकल लोबो करीत असल्याचे आपणही या पूर्वीच सांगितले होते, येथील पोलीस निरीक्षक येथे होणाऱ्या अंमली पदार्थ व्यवसायाला व वेश्या व्यवसायाला अभय देत असून आमदाराच्या आशिर्वादामुळे व निरीक्षकाच्या पाठिंब्यामुळे हे व्यवसाय फोफावले असून या व्यवसायातील दलाल ( टाऊज )यांच्या विरोधात तक्रार देऊनही कारवाई होत नाही,, संबंधित खात्याने येथील पोलीस निरीक्षकाच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी माजी सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी या पत्रकार परिषदेत केली.
आम्ही लोकांमध्ये आहोत आणी त्यांची कामे करीत आहोत. आम्हा तिघांचे एकच ध्येय भाजपाला कलंगुटातून उखडून टाकणे, आमच्या पैकी कोणालाही उमेदवारी मिळाली तरी सर्व एकत्रित पणे काम करणार असल्याचे अँथोनी मेनेझीस यांनी सांगितले.
फोटो……..कळंगुट येथे पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार आग्नेलो फर्नाडिस, सोबत जोसेफ सिक्वेरा, अँथोनी मेनेझीस व बेनेडिक्ट डिसोझा