गोवा फॉरवर्ड पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष तथा माजी आमदार किरण कांदोळकर यांनी पत्नी तथा थिवी जिल्हा पंचायत सदस्य कविता कांदोळकर व थिवी आणी हळदोणा मतदार संघातील पक्षाच्या समितीचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांसोबत गोवा फॉरवर्ड पक्षाला सोडचिट्ठी दिली, तशी घोषणा त्यांनी त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.यावेळी काँग्रेस विश्वासघातकी पक्ष असल्याचा घणाघाती आरोप केला.
या पत्रकार परिषदेला कविता कांदोळकर, गोवा फॉरवर्ड पक्षाच्या कार्यकारी समितीच्या सदस्या जेनिफर गोम्स, उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष प्रवीण आसोलकर, थिवी चे माजी सरपंच आनंद तेमकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
गोवा फॉरवर्ड पक्षात जाण्यापुर्वी आपण पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांना आपणाला थिवी व हळदोणा मतदार संघ देण्याची अट घातली होती, गोवा फॉरवर्ड ची काँग्रेस बरोबर युतीची बोलणी सुरू असल्याचे कानावर येत असून हळदोणा मतदार संघ गोवा फॉरवर्ड ला देण्यास उत्सुक नसल्याचे समजते, त्यात कालच काँग्रेसचा एक मोठा नेता तथा गोवा प्रभारी हळदोणा मतदार सघात काँग्रेसचा प्रचार करण्यास फिरत होता, यावरून असे दिसते की काँग्रेस पक्ष विजय सरदेसाई यांची दिशाभूल करीत आहे, या अगोदर काँग्रेस पक्षाने विजय सरदेसाई यांना दोनदा फसवले आहे.
हळदोणा मतदार संघात काँग्रेसचे काही कार्यच नसून आपण गेले वर्षभर कार्य सुरू केलेले आहे, काँग्रेस पक्ष कधीच वेळेवर युतीची बोलणी करीत नाही तसेच आपले उमेदवारही शेवटच्या क्षणी जाहीर करते त्यामुळे उमेदवाराला प्रचाराला वेळ मिळत नाही, युती नंतर हळदोणा मतदार संघ काँग्रेसला सोडल्यास आपल्याला माघार घ्यावी लागेल आणी ते मला व माझ्या कार्यकर्त्यांना मान्य नाही, म्हणून आपण गोवा फॉरवर्ड पक्ष सोडत आहे, आपले गोवा फॉरवर्ड चे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्याशी काही मतभेद नाहीत की तक्रारही नाही, त्यांनी आपल्याला चांगले मार्गदर्शन केले. येत्या निवडणुकीत अपक्ष की कोणत्या पक्षाबरोबर निवडणूक लढवावी हे कार्यकर्त्याबरोबर बोलून ठरवणार असल्याचे कांदोळकर यांनी सांगितले.
फोटो………. पत्रकार परिषदेत बोलताना किरण कांदोळकर सोबत कविता कांदोळकर व इतर…….. ( रमेश नाईक )