निवडणुकीच्या सहा महिन्यांपूर्वी तृनमूल पक्ष गोव्यात आला आहे आणि लोकांनी सर्वत्र झेंडे आणि पोस्टर लावून त्यांना आंधळेपणाने मतदान करावे अशी यांची अपेक्षा आहे.कोरोनाबाधित लोकसंख्या आर्थिक अडचणीत असताना पक्षाने जाहिराती आणि होर्डिंगवर पश्चिम बंगालच्या सरकारी तिजोरीतून अवाजवी खर्च केल्याची टीका उत्तर गोवा काँग्रेस जिल्हा समितीचे अध्यक्ष विजय भिके यांनी केली.
म्हापसा येथील पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुढे बोलताना भिके म्हणाले की तृनमूल काँग्रेस पक्ष त्यांच्या राजकीय प्रचारासाठी जाहिराती आणि होर्डिंग तसेच सोशल मीडियावर कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. त्यांनी बेकायदेशीरपणे विजेच्या खांबांवर झेंडे लावले आहेत. पक्षाचे झेंडे, पोस्टर्स, बॅनर्स त्यांना निवडणूक जिंकण्यास मदत करणार नाहीत, हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. सार्वजनिक निधीचा असा उघड गैरवापर केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे भिके यांनी यावेळी सांगितले.करोना महामारीमुळे आणी महागाई मुळे सामान्य जनता आपला उदर निर्वाह करण्यासाठी संघर्ष करीत आहे आणी तृनमूल काँग्रेस राज्यभर जाहिरातीवर पैसे उधळत आहे. करोना बाधित जनता आर्थिक अडचणीत असताना तृनमूल काँग्रेसने गोव्यात जाहिरातीवर खर्च केलेल्या पैशाची चौकशी करावी अशी मागणी भिके यांनी या पत्रकार परिषदेतून केली.
दरम्यान सेंट फ्रान्सिस झेवियरच्या उत्सवानिमित्त विजय भिके यांनी गोवा वासियांना यावेळी शुभेच्छा दिल्या.या पत्रकार परिषदेला त्यांच्या सोबत कोषाध्यक्ष सिद्धेश कामत आजरेकर, एनजीडीसीसीचे सरचिटणीस रामचंद्र गावडे; एनजीडीसीसीचे सचिव प्रकाश नाईक आणि ओबीसी सेलचे अध्यक्ष अमेय एम. कोरगावकर उपस्थित होते.
फोटो…….. म्हापसा येथील उत्तर गोवा काँग्रेस पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाध्यक्ष विजय भिके सोबत इतर मान्यवर……. ( रमेश नाईक )