म्हापसा दि. 4 ( प्रतिनिधी )
गोवा हे जगातील सर्वात सुंदर असे पर्यटन स्थळ आहे, आणी पुढेही राहील या करिता केंद्र सरकार सर्व प्रकारची मदत करीत राहील, गोवा विकासाच्या प्रगतीपथावर राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचे आश्वासन केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांनी दिले.
केंद्रीय पर्यटन खात्यामार्फत गोव्यातील आग्वाद किल्ला, सेंट केथड्रॉल चर्च व महादेव मंदिर, कुर्डी या तीन जागांचा सुमारे दहा करोड खर्चून सुशोभीकरण व लाईट आणी साऊंड शो उपक्रमाच्या कामाचा शुभारंभ केंद्रीय मंत्री जी.किशन रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, घनकचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो, गोवा पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे, पुरातत्व खात्याच्या संचालक डॉ. महेश्वरी, इंडियल ऑइल चे अधिकारी विनय मिश्रा उवस्थित होते.
गोव्यात सध्या पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत कारण त्यांनी करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत, भारताच्या मोठ्या लोकसंखेला ताबडतोब बाहेरील कोणताही देश लशी पुरवू शकणार नाही याची जाणीव झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातच लसचे उत्पादन सुरू केले त्यामुळेच लसीकरण मोठ्या प्रमाणात होऊन जनतेला दोन्ही डोस मिळाले म्हणून पर्यटक बिनधास्त पणे फिरत आहेत असे मंत्री रेड्डी यांनी सांगितले.
गोव्यातील केंद्राच्या मदतीने सुरू करण्यात आलेले विकासकामाचे प्रकल्प लवकर पूर्ण केल्यास पुढील विकास कामास आणखी दहा करोड केंद्राकडून मिळतील असे मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. तर गोव्यातील पुरातन वारसास्थळे जतन करण्यासाठी केंद्राने सर्वतोपरी मदत करण्याची गरज असल्याचे मंत्री मायकल लोबो यांनी सांगून आग्वाद किल्ला देखभालीसाठी दिलेले खाजगी कंत्राट रद्द करण्यात आल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपणास फोन करून सांगितल्याचे सांगितले.
यावेळी दयानंद सोपटे यांनी गोवा पर्यटन खात्याच्या उपक्रमाची माहिती दिली.
फोटो…….. आग्वाद किल्ल्यावर म्युझिक व लाईट शो च्या कामाचा दीपप्रज्वलन करून शुभारंभ करताना केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी सोबत मंत्री श्रीपाद नाईक व इतर मान्यवर….. ( रमेश नाईक )