म्हापसा दि. 10 ( प्रतिनिधी )
अनेक वर्षे रेंगाळलेल्या हणजूण कायसूव पंचायती समोरील रस्त्याच्या फेर डांबरीकरण व हॉटमिक्सींग च्या कामाचा शुभारंभ माजी मंत्री तथा शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
दोन वर्षापुर्वी हणजूण कायसूव पंचायत क्षेत्रातील बहुतेक सर्व रस्त्यांचे फेरडांबरीकरण हॉटमिक्सींग करण्यात आले होते, वागातोर पेट्रोल पंप ते हणजूण तिठा पर्यंतचा रस्ता काही कारणाने तसाच खड्डेमय राहिला होता. या रस्त्याच्या दुरुस्तीची व हॉटमिक्सींग फेरडांबरीकरणाची मागणी सतत करण्यात येत होती. पंचायत क्षेत्रात भूमिगत वीजवाहिनी घालण्याच्या कामाला सुरवात करण्यात आल्याने पंचायत क्षेत्रातील सर्व रस्ते पुन्हा खड्डेमय झाले होते.
हणजूण वागातोर हा पर्यटन पट्टा असल्याने येणाऱ्या पर्यटकांना चांगले रस्ते मिळावेत या करिता या पंचायत क्षेत्रातील रस्त्यांचे फेरडांबरीकरण व हॉटमिक्सींग करण्याच्या कामास सुरवात करण्यात आली आहे, पंचायती समोरचा हा रस्ता कोर्टकचेरीमुळे रेंगाळला होता, आता सर्व अडथळे दूर झाल्याने 2.5 करोड खर्चून या रस्त्यांचे फेरडांबरीकरण व हॉटमिक्सींग करण्यात येत आहे अशी माहिती आमदार पालयेकर यांनी यावेळी उपस्थित पत्रकारांना दिली. यावेळी या प्रभागाच्या पंचसदस्य शकुंतला चिमुलकर, पंचसदस्य पेद्रो मेंडोन्सा व ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान भायलो हुडो, दांडो शिवोली येथे सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे सुमारे 20 लाख खर्चून दोन ( साकव ) लहान पुलांच्या बांधकामाचा शुभारंभ आमदार पालयेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
फोटो ……. हणजूण येथे रस्ता हॉटमिक्सींग फेरडांबरीकरणाच्या कामाचा नारळ वाढवून शुभारंभ करताना आमदार विनोद पालयेकर, सोबत पंचसदस्य शकुंतला चिमुलकर, पेद्रो मेंडोन्सा व इतर……… ( रमेश नाईक )