हणजूण कायसूव पंचायत क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढलेला असून त्याचा त्रास वाहन चालकांना व पादचाऱ्यांना होत असल्याने पंचायतीने त्यांचा बंदोबस्त करावा म्हणून अनेक वेळा ग्रामसभेतून मागणी करूनही या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
वागातोर समुद्र किनारा, झोरवाडा, लायन्स क्लब, पंचायत मैदान अश्या काही ठिकाणी व नाक्यावर या भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या असून त्यांच्यापासून पहाटेच्यावेळी रस्त्यावर व किनाऱ्यावर चालण्याचा व्यायाम करणाऱ्यांना त्रास होतो तर बऱ्याच वेळा ही भटकी कुत्री दुचाकी चालकांच्या मागे लागतात त्यामुळे लहान मोठे अपघात घडण्याचे प्रकार झाले आहेत.
दिड वर्षांपूर्वी अश्या भटक्या कुत्र्यांनी झोरवाडा हणजूण येथील एका महिलेवर हल्ला करून जखमी केले होते, प्रसंगावधन राखून मायकल डिसोझा यांनी त्या महिलेची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली होती. संपूर्ण पंचायत क्षेत्रात 200 हून जास्त भटकी कुत्री असण्याची शक्यता आहे.
फोटो ……. वागातोर किनाऱ्यावर तसेच पंचायत मैदानाजवळ असलेली उपद्रवी भटकी कुत्री…… ( रमेश नाईक )