नकारात्मक शक्तींनी देशाचा पाया कमकुवत केला : दिनेश राव
पणजी: भाजपवर टिकास्त्र करताना काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी मंगळवारी सांगितले की, नकारात्मक शक्ती काँग्रेसचा नाश आणि पाडाव करण्याचा प्रयत्न करीत आहे, असे केल्यास त्यांना त्यांच्या इच्छेनुसार देश आणि लोकशाही कमकुवत करणे शक्य होते.
“आम्ही आमच्या देशाला कमकुवत करू देणार नाही आणि लोकांचा आवाज दाबू देणार नाही.” असे राव म्हणाले.
काँग्रेसने पणजी येथे 137 वा स्थापना दिन साजरा केला. त्या वेळी दिनेश राव बोलत होते. यावेळी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमदार प्रतापसिंह राणे, खासदार फ्रान्सिस सार्दिन, एम के शेख आदी उपस्थित होते.
“राष्ट्राचा पाया धोक्यात आहे. प्रत्येक गोष्टीत फेरफार केल्याने आमचा संस्था, संसद, लोकशाहीवरील विश्वास उडत चालला आहे.’’ असे राव यांनी म्हटले.
ते म्हणाले की, भाजपने अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे की देशातील लोक बोलण्यास आणि आपले मत मांडण्यास घाबरत आहेत. “सत्ताधारी पक्षाच्या इच्छेविरुद्ध बोलल्यास त्यांना परिणाम, हल्ले आणि अपमानाला सामोरे जावे लागेल हे लोकांना माहीत आहे. त्यासाठी ते अन्याया विरुद्ध आवाज काढत नाही.” अशी खंत राव यांनी व्यक्त केली.
राव म्हणाले की, काँग्रेस पक्षाने नेहमीच अन्यायाविरुद्ध लढा दिला असून काँग्रेसची मागील १३७ वर्षे भारतीय इतिहासाचे प्रतिबिंब आहेत. जनतेच्या हक्कांसाठी लढताना आमच्या नेत्यांच्या हत्या झाल्या. “काँग्रेस अल्पसंख्याक, दुर्बल घटक, आदिवासी, दलित यांच्या आवाजाचे, आकांक्षा आणि आशांचे प्रतिनिधित्व करते. आम्ही त्यांना नेहमीच बळ दिले आहे आणि देत राहू.” असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, भाजपने गोव्याची लोकशाही कमकुवत केली आहे. “देशाचा आणि गोव्याच्या लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी आपण आमच्या पुढे असलेले आव्हान स्वीकारले पाहिजे आणि देशाचा पाया मजबूत केला पाहिजे.” असे ते म्हणाले.
चोडणकर म्हणाले की, ‘काँग्रेस मुक्त भारत’ करण्यात भाजप कधीही यशस्वी होणार नाही.
“काँग्रेसने गोवा मुक्ती, ओपिनियन पोलसाठी संघर्ष केला. आमच्या नेत्यांनी गोव्यासाठी मोठे योगदान दिले आहे. आता येणाऱ्या निवडणुका गोव्याचे भवितव्य आणि अस्मिता ठरवतील. नकारात्मक शक्तीचा नाश करून आमचे लोक त्यावर ठामपणे निर्णय घेतील.’’ असे चोडणकर यांनी प्रतिपादन केले.
भाजपवर टिका करताना चोडणकर म्हणाले की, इंग्रजांनी वापरलेली धोरणे आता भाजप लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी वापरत आहेत. मतांचे विभाजन करण्यासाठी भाजपने गोव्यात अनेक राजकीय पक्ष आणले आहेत.
प्रतापसिंह राणे यांनी काँग्रेस आणि गोव्यातील गेल्या 50 वर्षातील घटना कथन करताना काँग्रेस पक्ष मजबूत केला पाहिजे आणि त्यासाठी सर्वांनी काम केले पाहिजे असे म्हटले. तसेच गोवा राज्याच्या भवितव्यासाठी सर्वांनी योगदान दिले पाहिजे असे ते म्हणाले.
यावेळी इतरांचीही भाषणे झाली.