अभिव्यक्ती स्वातंत्र्य दोन्ही बाजूने हवे, मात्र आपल्या देशात तसे होताना दिसत नाही. हिंदु देवदेवतांचा अपमान करणार्यांना एक न्याय आणि गांधीजींच्या विचारांशी असहमती दाखविणार्यांच्या विरोधात दुसरा न्याय ? हा भेदभाव या देशात चालणार नाही. जर कालीचरण महाराजांनी केलेले वक्तव्य चुकीचे ठरवून त्यांना अटक करणे ठीक असेल, तर राहुल गांधी यांनीही अनेकदा हिंदु धर्माविषयी चुकीची विधाने केली आहेत, तर त्यांनाही अटक करावी लागेल’, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता गौरव गोयल यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हिंदु देवी–देवतांचा अपमान अभिव्यक्ती; तर गांधीजींवर बोलणे अपराध का ?’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.
या वेळी बोलतांना इतिहासाचे अभ्यासक तथा लेखक–अधिवक्ता सतीश देशपांडे म्हणाले की, राष्ट्रापेक्षा मोठा कोणी असू शकत नाही. संविधानाच्या कोणत्याही कलमात अमूक एखाद्या व्यक्तीला ‘राष्ट्रपिता’ संबोधावे, असे म्हटलेले नाही. तसेच कोणी व्यक्ती म्हणून ‘राष्ट्रपिता’ असावी, अशीही आपल्याकडे व्यवस्था नाही. गांधीजी त्यांच्या विवादास्पद जीवनकाळात मुळातच ‘अलोकप्रिय’ होते. त्यामुळे आतापेक्षा त्यांच्या जीवनकाळात त्यांना अधिक टीकेचा सामना करावा लागला होता. गांधीजींवर टीका–टीप्पणी करण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. न्यायालयाने तशी सूट दिली आहे. गांधींच्या कार्याचे मूल्यमापन व्हायला हवे.
‘राष्ट्रीय वारकरी परिषदे’चे प्रवक्ता ह.भ.प. अरुण महाराज पिंपळे म्हणाले की, आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस अशा अनेक राष्ट्रपुरुषांचा अपमान या देशात केला गेला; मात्र केवळ गांधींवर टीका केली की त्याला अपराध मानले जाते. थोडक्यात या देशात राष्ट्रप्रेमी नागरिक, साधू–संत यांसाठी एक कायदा आणि राजकीय नेत्यांसाठी वेगळा कायदा आहे. हिंदूंनी साधू–संतांच्या पाठीशी ठामपणे उभे रहाणे गरजेचे आहे. छत्तीसगड येथील ‘सुदर्शन’ वृत्तवाहिनीचे ब्युरो प्रमुख श्री. योगेश मिश्रा म्हणाले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीत समान मापदंड असायला हवे. कायदेतज्ञांनी कालीचरण महाराजांना अटक करणे, त्यांच्यावर लावण्यात आलेली कलमे यांविषयी छत्तीसगड सरकार आणि पोलीस–प्रशासन यांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. नरेंद्र सुर्वे म्हणाले की, हिंदु देवी–देवतांची नग्न चित्रे काढणारा म.फि. हुसेनला काँग्रेस पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. हिंदु देवी–देवतांचा अपमान करणार्या मुन्नवर फारूकीसारख्या विनोदी कलाकारांना काँग्रेस पाठिंबा देते. काँग्रेस सातत्याने स्वा. सावरकरांचा अपमान करते; मात्र गांधींविषयी कोणी प्रश्न उपस्थित केले, तर काँग्रेसला राग येतो. हिंदु आणि राष्ट्रप्रेमी नागरिक चुकीच्या गोष्टींवर प्रश्न उपस्थित करणार आणि त्याचे उत्तर संबंधितांना द्यावेच लागेल.