कोमप गोवा’तर्फे म्हापशात मराठी पत्रकारदिन साजरा
म्हापसा दि.7 ( प्रतिनिधी )
कोकण मराठी परिषद गोवा तर्फे म्हापसा येथे मराठी पत्रकारदिन साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी समाजसेविका सिद्धी नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. या वेळी कोकण मराठी परिषद गोवाचे अध्यक्ष सुदेश आर्लेकर, कार्यवाह अक्षता किनळेकर, साहित्यिक शीतल साळगावकर व सामाजिक कार्यकर्ता सुदेश तिवरेकर उपस्थित होते.
बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ या दिवशी दर्पण या मराठी वृत्तपत्राची सुरुवात करून मराठी पत्रकारितेचा पाया रचला, असे या वेळी सुदेश आर्लेकर यांनी यांनी नमूद केले. मराठीला त्यांनी उच्च स्थानावर नेत मराठी भाषेतून विचार प्रकट करण्याची संधी लोकांना दिली, असेही ते म्हणाले.
सिद्धी नाईक वृत्तपत्रांचे महत्त्व स्पष्ट करताना म्हणाल्या, वृत्तपत्र समाजाचा आरसा आहे. वृत्तपत्राद्वारे नवनवीन माहिती मिळते. आजकाल लोक छापील वृत्तपत्राला फारसे महत्व देत नाहीत. एखादा मुद्दा, समस्या अथवा गुन्हा केवळ एक किंवा दोन दिवस वृत्तपत्रांतून उठवला जातो. कालांतराने तो विषय मागे पडतो. त्यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे. वृत्तपत्र एक शस्त्र आहे. वृत्तपत्राद्वारे क्रांती घडवून आणता येते. त्यासाठी त्याचा चांगला उपयोग करणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या.
शीतल साळगावकर यांनी आपल्या भाषणाद्वारे पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपावर स्वत:चे विचार प्रकट केले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात कित्येक वृत्तपत्रांची सुरुवात झाली होती. असे त्या म्हणाल्या.
मराठी पत्रकारदिनाचे औचित्य साधून जेष्ठ पत्रकार सुदेश आर्लेकर यांचा पत्रकारितेतील भरीव योगदानाबद्दल म्हापसा पीपल्स युनियनतर्फे सिद्धी नाईक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन अक्षता किनळेकर यांनी, तर आभारप्रकटन महेश शिरगावकर यांनी केले. हा कार्यक्रम लक्ष्मीनारायण मंदिराजवळील दिलखूश बिल्डिंगच्या छोटेखानी सभागृहात झाला.
फोटो….म्हापसा येथे कोकण मराठी परिषद गोवा तर्फे आयोजित मराठी पत्रकारदिन कार्यक्रमाचे उद्घाटन करताना सिद्धी नाईक. बाजूला अक्षता किनळेकर, सुदेश आर्लेकर, शीतल साळगावकर व सुदेश तिवरेकर.