म्हापसा दि. 7 ( प्रतिनिधी )
पर्यटकाच्या स्कुटरच्या डिकीतून गो प्रो कॅमेरा, आय फोन मोबाईल व इतर सामान मिळून सुमारे 67800/- किंमतीचा ऐवज चोरी प्रकरणी हणजूण पोलिसांनी मुबीन खान मोहम्मद खान रा. मुस्लिम वाडा, डिचोली याला अटक केली आहे.
चोरीची घटना दि 29 डिसें.2021 रोजी वागातोर येथील हॉटेल हिलटॉप च्या बाहेर पार्किंग मध्ये घडली. 27,28 व 29 रोजी हॉटेल हिलटॉप मध्ये सनबर्न संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या काळात आलेल्या बऱ्याच पर्यटकांचे मोबाईल चोरी झाल्याच्या तसेच दुचाकी व चारचाकी वाहनातून सामान चोरी झाल्याच्या तक्रारी होत्या.
दि.29 रोजी दिल्ली येथील अर्जुन गोयल हा पर्यटक या सनबर्न महोत्सवासाठी आला होता, त्याने भाड्याने घेतलेली स्कुटर हॉटेल हिलटॉप च्या बाहेर पार्किंग मध्ये पार्क केली होती. हॉटेल मधून रात्रौ बाहेर आल्यानंतर त्याने पार्क करून ठेवलेल्या स्कुटरच्या डिकीतून त्याने हॉटेलात जाण्यापूर्वी ठेवलेला काळ्या रंगाचा रु.40000/- किंमतीचा गो प्रो कॅमेरा, 2 मेमरी कार्ड्स, कॅमेरा कव्हर, रु.800/- किंमतीचा एमआय पॉवरबँक, लाल रंगाचे गॉगल, रु.25000/- किंमतीचा रोज गोल्ड रंगाचा आयफोन मोबाईल, रु.2000/- किंमतीचा चार्जर केबल व इअरफोन अज्ञात चोरट्याने कोरल्याची तक्रार गोयल याने हणजूण पोलिसात दिली.
तक्रारीनंतर तपास करीत असताना हणजूण पोलिसांना ओएलएक्स या साईटवर एक गो प्रो कॅमेरा विकण्याची जाहिरात डिचोली येथील मुबीन खान याने दिल्याचे समजले. पोलिसांनी एक बनावट गिऱ्हाईक तयार करून मुबीन खान याला हडफडे येथे कॅमेरा घेण्यासाठी बोलावले. मुबीन खान हडफडे येथे आल्यावर हणजूण पोलिसांनी संशयित म्हणून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो कॅमेरा व इतर सामान वागातोर येथून स्कुटरच्या डिकीतून चोरल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेला बहुतेक सर्व ऐवज हस्तगत केला असून पुढील तपास निरीक्षक सुरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुकाराम पेडणेकर करीत आहेत.
फोटो…… वागातोर येथून स्कुटरच्या डिकीतून कॅमेरा व मोबाईल चोरी प्रकरणी अटक केलेल्या संशयितासह उपनिरीक्षक सुजय कोरगावकर, उपनिरीक्षक तुकाराम पेडणेकर व इतर पोलीस……. ( रमेश नाईक )