लोकशाही आणि जनतेच्या विरोधातील भाजपला घरी पाठवा : काँग्रेस
– पोलिसांनी रोखला धिक्कार मोर्चा
पणजी : भाजप सरकारच्या १० वर्षांच्या विश्वासघात, भ्रष्टाचार आणि असंवेदनशीलतेच्या विरोधात २१ कलमी आरोपपत्र राज्यपालांना सादर करण्यापासून काँग्रेसला रोखण्याच्या भाजप सरकारच्या कृत्याचा निषेध करत, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी शुक्रवारी सांगितले की, भाजप लोकशाहीच्या विरोधात काम करत आहे आणि त्यामुळे गोव्यातील जनता काँग्रेस पक्षाला पुन्हा सत्तेवर आणणार.
दोनापावल येथून राजभवनाकडे धिक्कार मोर्चा नेताना, काँग्रेस नेते आणि समर्थकांना पोलिसांनी रोखले.
काँग्रेसचे निरीक्षक पी चिदंबरम, जीपीसीसीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, दिगंबर कामत, खासदार फ्रान्सिस सार्दिन, संकल्प आमोणकर, कन्हैया कुमार, अॅड. वरद म्हार्दोळकर अन्य नेते आणि काँग्रेस समर्थक यावेळी उपस्थित होते.
“लोकशाहीत प्रत्येकाला राज्यपालांना भेटण्याचा अधिकार आहे. मात्र भाजप नेत्यांच्या सांगण्यावरून त्यांनी आम्हाला दिलेला वेळ रद्द केला. हा खूप वाईट ट्रेंड आहे. भाजपचे सरकार कायमस्वरूपी राहणार नाही. काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम करू आणि लोकांची इच्छा सत्यात आणू.’’ असे कामत म्हणाले.
राज्यपाल आणि भाजपचे कृत्य म्हणजे लोकशाहीची थट्टा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘भाजप लोकशाहीच्या विरोधात असल्याचे आज सिद्ध झाले आहे.’’ असे ते म्हणाले.
चोडणकर म्हणाले की, आजचा दिवस लोकशाहीसाठी काळा दिवस आहे. भाजपला काँग्रेसची भीती वाटते. सत्तेत राहण्यासाठी भाजपने आमदार खरेदी केले. पण ते काँग्रेसचे मतदार आणि समर्थक खरेदी करू शकणार नाहीत. हे जाणून ते हताश झाले आहेत आणि जिंकण्याचा आत्मविश्वास गमावला आहे.
चोडणकर म्हणाले की, पोलिस भाजपच्या नेत्यांच्या आदेशावरुन काम करत असून, सुपर मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना रोखले.
“सुपर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना आम्हाला न भेटण्याचे निर्देश दिले. मात्र आम्ही त्यांच्यावर आरोपपत्र जारी करून भाजपचा पर्दाफाश करू.’’ असे चोडणकर म्हणाले.
काँग्रेसचे सरकार आल्यावर हेराफेरी करून दिलेल्या नोकऱ्या रद्द केल्या जातील, असे ते म्हणाले. “भाजप पाच पेक्षा जास्त जागा जिंकणार नाही.” असे ते म्हणाले.
जनतेला आवाज उठवणे हे विरोधकांचे कर्तव्य असून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांकडे लक्ष द्यावे, असे कन्हैया कुमार म्हणाले.
काँग्रेस नेत्यांनी भाजपच्या या कृत्याचा निषेध केला आहे.