म्हापसा दि. 10 ( प्रतिनिधी )
करोना महामारीचा वाढता प्राधुर्भाव पाहता करोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरवात झाली असून गोवा सरकारने प्राधुर्भाव रोखण्यासाठी काही नियम घालून या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. आरोग्य खातेही आपल्या परीने महामारी रोखण्यासाठी काम करीत आहे.
हणजूण कायसूव पंचायत क्षेत्रातसुद्धा करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून वागातोर येथे डिसें 2021 च्या अखेरीस झालेल्या सनबर्न संगीत महोत्सवानंतर व त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या रेव्हपार्ट्या नंतर करोनाच्या केसेस वाढल्याचे सांगितले जाते. करोना महामारीच्या दुसऱ्यालाटेवेळी वागातोर येथे एप्रिल 2021 मध्ये एका बालोद्यानाच्या उदघाटनांतर पंचायत क्षेत्रात करोनाच्या रुग्णसंखेत वाढ झाली होती.
आता पंचायत क्षेत्रात करोनाच्या रुग्णसंखेत होत असलेलली वाढ रोखण्याकरिता पंचायत पातळीवरही काम करण्याची गरज असल्याने या संदर्भात हणजूण कायसूव पंचायतीचे सरपंच तथा येत्या विधानसभा निवडणुकीचे संभाव्य उमेदवार सावियो अल्मेदा यांना विचारले असता करोना वाढीचा प्राधुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती करण्याचा पंचायतीचा विचार असून आरोग्य खात्याकडे तसेच सरकारकडे पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.