म्हापसा दि. 10 ( प्रतिनिधी )
गोव्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हणजूण कायसूव पंचायत क्षेत्रात बेकायदा बांधकामांना ऊत आला असून या बेकायदा बांधकामावर पंचायतीने पूर्णपणे दुर्लक्ष चालवल्याची चर्चा पंचायत क्षेत्रात आहे.
येथील हणजूण वागातोर या किनारी भागात सागरी नियमांचे उल्लंघन करून तात्पुरत्या बांधकामच्या नावाखाली लोखंडी खांब उभारून पक्के व मजबूत बांधकाम करण्यावर भर दिला जात आहे. किनाऱ्यावरील बहुतेक बांधकामे ही बिगर गोमंतकीय धनाढ्याकडून करण्यात येत असून त्यातील काहीजणांना स्थानिकांचे सहकार्य लाभत असल्याने बांधकाम कर्ते कोणाला जुमनात नाहीत.
किनारीभागा प्रमाणेच येथील शेत जमिनीत मातीचा भराव टाकून तर काही ठिकाणी शेतजमिनीतच तसेच काही ठिकाणी बेकायदा डोंगर कापणी करून बेकायदेशीर रित्या बांधकाम होत असल्याचे सर्वत्र पहावयास मिळते.
या पंचायतीचे सरपंच हे गोवा विधानसभेची निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी करीत असल्याने पंचायत क्षेत्रातील बांधकामावर कारवाईचे हत्यार उभारल्यास त्याचा परिणाम मतदानवर होण्याची शक्यता असल्याने कदाचित या बेकायदेशीर बांधकामांना अभय मिळत असावे अशी प्रतिक्रिया येथील एका पंचसदस्याने नाव न घालण्याच्या अटीवर दिली.
दरम्यान सरपंच सावियो अल्मेदा यांना विचारले असता बेकायदा बांधकामाची कोणी तक्रार दिल्यास त्यावर पंचायत कारवाई करेल असे सांगितले.