राज्यात वाढत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर हणजूण वाहतूक पोलिसांनी हणजूण, वागातोर, शिवोली, हडफडे या त्यांच्या कार्यक्षेत्रात टॅक्सी चालक व इतर वाहन चालकात जनजागृती मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत वाहन चालकांना माहिती पुस्तिका देऊन वाहतूक नियमांचे उल्लंघन न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे अशी माहिती हणजूण वाहतूक पोलीस उपनिरीक्षक वामन नाईक यांनी दिली.
दिवसा वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दंड वसूल केला जातोच आता रात्रीच्या वेळीही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तसेच रात्रीच्या वेळी दारू पिऊन वाहन चालवताना आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल केला जात आहे असे नाईक यांनी सांगितले.
दरम्यान 2021 या वर्षात हणजूण वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 28850 जणांकडून एकूण रु.332900/- दंड वसूल केला यात विना हेल्मेट दुचाकी चालवणे, दुचाकीवर तीन व्यक्तींनी प्रवास करणे व चारचाकी वाहन चालवताना सीट बेल्ट चा वापर न करणे या गुन्ह्यांचा जास्त समावेश असल्याची माहिती उपनिरीक्षक नाईक यांनी दिली.