काँग्रेसच्या उमेदवारांनी घेतली एकजूटीची शपथ
पणजी: काँग्रेस पक्षाच्या ३६ उमेदवारांनी शनिवारी महालक्ष्मी मंदिर, बांबोळी येथील खुरीस आणि बेती येथील हजरत मोहम्मद हमजाशाह दर्गा येथे जाऊन शपथ घेतली की ते पक्षांतर करणार नाहीत आणि गोव्याच्या हितासाठी एकजुटीने काम करणार.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि निवडणूक रणनीतीकार पी चिदंबरम, गोव्याचे प्रभारी दिनेश गुंडू राव, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, जीपीसीसीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर आणि काँग्रेसचे इतर नेते सर्व ३६ उमेदवारांसह यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना दिगंबर कामत म्हणाले की, काँग्रेसचे उमेदवार निवडून आले तर ते इतर पक्षात जातात या लोकांच्या समजाबाबत काँग्रेस अत्यंत गंभीर आहे. “आम्ही याबाबत खूप गंभीर आहोत आणि कोणत्याही पक्षाला आमच्या आमदारांना विकत घ्यायला देणार नाही. आम्ही देवाला मानतो. देवावर आमचा पूर्ण विश्वास आहे. म्हणून आज आम्ही प्रतिज्ञा घेतली आहे की आम्ही चुकणार नाही.” असे कामत म्हणाले.
ते म्हणाले की, मागील पक्षांतरांना केवळ काँग्रेसच जबाबदार नाही, तर त्यांच्या आमदारांना पक्षांतर करण्यासाठी प्रवृतत् केलेला भाजपही तितकाच जबाबदार आहे. “भाजपने त्यांना ऑफर दिली आणि म्हणून त्यांनी पक्ष बदलला. आम्ही गोव्यातील लोकांना खात्री देऊ इच्छितो की असे पुन्हा होणार नाही.” असे कामत म्हणाले.
“ राजकिय घाऊक खरेदी बंद व्हायला पाहिजे. यासाठी गोव्यातील लोकशाहीचा घात करणाऱ्या पक्षांतरांविरुद्ध आम्ही आक्रमकपणे काम करत आहोत.’’असे ते म्हणाले.
मंदिर, चर्च आणि दर्गा यांवर आपली पूर्ण श्रद्धा असून गोवावासीय जातीय सलोखा पाळतात, असे कामत म्हणाले. “म्हणून आम्ही देवासमोर शपथ घेण्याचे आणि आशीर्वाद घेण्याचे ठरवले.’’ असे ते म्हणाले.
काँग्रेस पक्ष आणि गोव्यातील जनतेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ उमेदवारांनी घेतली.