माझ्यामतदारांचा आशीर्वाद पाठीशी
जोसुआ डिसोझा : प्रभाग १६ मध्ये घरोघरी संपर्क मोहीम
म्हापसा, दि. २६ :
म्हापसा मतदारसंघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार जोशुआ डिसोझा यांनी आज प्रभाग क्रमांक १६ मध्ये घरोघरी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत प्रभाग क्रमांक १६ चे नगरसेवक विराज फडते, प्रभाग क्रमांक १५ चे नगरसेवक स्वप्नील शिरोडकर, सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे, अशा परब, नंदा आम्रे, संतोष गोवेकर, भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री. डिसोझा यांनी या दरम्यान खोर्ली परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. तसेच ऋतुराज रेसिडेन्सी हौसिंग सोसायटी परिसरातही घरोघरी संपर्क मोहीम राबवली. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, माझ्या वडिलांनी तब्बल ३० वर्षे या मतदारसंघात केलेले काम लोकांना माहीत आहे. माझ्या कारकिर्दीत मी केलेले काम लोकांच्या नजरेसमोर आहे. केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारच्या सहकार्याने माझ्या मतदारसंघात अनेक विकासकामे केली आहेत. मिलाग्रिस चर्च परिसराचे सुशोभीकरण, तार नदीतील गाळ उपसा, तारिकडे परिसरात नदी किनारी सौंदर्यीकरण, नवीन बस स्थानक, अंतर्गत रस्ते, पिण्याचे पाणी आदी महत्त्वाची कामे पूर्ण केली असल्याचे ते म्हणाले. नियोजित बाजार संकुल आणि सध्या असलेल्या पोर्तुगीजकालीन बाजाराचे सुशोभीकरण या कामांचा समावेश आहे. बाजारपेठेतील फळ विक्रेते आणि भाजी विक्रेते तसेच मासे विक्रेते यांच्यासाठी मरड येथे बाजार संकुल साकारले. यामुळे विद्यमान बाजारपेठेतील पदपथ लोकांसाठी मोकळे झाले आहेत. तसेच व्यापाऱ्यांची समस्या सुटली आहे. तरीही काही समस्या आणि अडचणी राहिल्या असतील तर त्या आगामी काळात सोडवल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
भाजपा सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या मायकल लोबो यांनी म्हापसा मतदारसंघातही लक्ष घातले आहे. या पार्श्भूमीवर डिसोझा म्हणाले, लोबो यांच्या भूमिकेमुळे मला काही फरक पडत नाही. येथे कोणीही आले आणि कितीही प्रयत्न केले तरी माझा विजय निश्चित आहे. लोक माझ्या सोबत आहेत. मी सध्या करत असलेल्या घरोघरी प्रचार मोहिमेस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बार्देश तालुक्यावर मजबूत पकड असल्याचा दावा किती फोल आहे हे येणारा काळच ठरवेल. माझ्यासोबत माझ्या वडिलांची पुण्याई आणि मतदारसंघातील लोकांचे आशीर्वाद आहेत. यामुळे कोण किती पाण्यात आहे हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.