म्हापसा दि. 25 (प्रतिनिधी )
म्हापसा पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी केलेल्या कारवाईत सोलापूर, महाराष्ट्र येथील विनोद शामराव चव्हाण (42) सध्या रा. बोडगिणी, म्हापसा यास अटक करून सुमारे एक लाख रुपयांचा अंमली पदार्थ जप्त केला. दि.25 रोजी दुपारी 2 ते 3.30 या वेळेत ही कारवाई करण्यात आली.
म्हापसा पोलीस निरीक्षक निनाद देऊलकर यांनी दिलेल्या माहिती नुसार म्हापसा येथील बोडगेश्वर देवस्थान वाहन तळ विभागात अंमली पदार्थ विक्रीकरिता आणण्यात येणार असल्याची खबर मिळाल्यानंतर निरीक्षक निनाद देऊलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील पाटील, उपनिरीक्षक विजय कोरगावकर, हवालदार सुशांत चोपडेकर, महिला पोलीस विभा वळवईकर, पोलीस शिपाई प्रकाश पोळेकर, अभि कासार, अक्षय पाटील, आनंद राठोड, अनिकेत कळंगुटकर, तुकाराम कांबळी या पोलीस पथकाने दुपारी दोन च्या सुमारास त्या ठिकाणी धाड टाकली असता विनोद चव्हाण हा संशयास्पद रित्या घुटमळताना आढळला, त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याचेकडे एक किलो शंभर ग्राम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ सापडला.
पंचनामा करून विनोद चव्हाण याचे विरुद्ध अंमली विरुद्ध कायद्याखाली गुन्हा नोंद करून अटक केली असून पुढील तपास निरीक्षक निनाद देऊलकर, उपअधीक्षक उदय परब यांच्या मार्गदर्शनाखाली म्हापसा पोलीस करीत आहेत.
फोटो…. अंमली पदार्थ विरोधी कायद्याखाली अटक केलेल्या संशयीतासह उपअधीक्षक उदय परब, निरीक्षक निनाद देऊलकर व इतर पोलीस……. ( रमेश नाईक )