म्हापसा मतदारसंघात घातून तृणमूल काँग्रेसने अॅड. तारक आरोलकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी सध्या प्रचाराला आणखीन गती दिली आहे. आज शुक्रवार २८ रोजी त्यांनी खोर्ली-म्हापसा येथील घाटेश्वराचे दर्शन घेऊन त्या भागात झंजावाती प्रचारदौरा केला. या मतदारसंघात विजयी होणारच असल्याचा ठाम विश्वास आरोलकर यांनी व्यक्त केला आहे.
दयाळू व्यक्ती, कुटुंबवत्सल, क्रियाशील सामाजिक कार्यकर्ता, लोकांच्या समस्यांना वाचा फोडणे, मदतगार, जनतेला दिलेल्या आश्वासनांची वेळेतच परिपूर्ती करणे इत्यादी गुणवैशिष्ट्यांमुळे आरोलकर यांचा विजय निश्चित असल्याचा दावा कार्यकर्त्यांनीही प्रचारादरम्यान केला आहे.
म्हापसा पालिका क्षेत्राला दीर्घ काळ ग्रासणारी पाणीपुरवठ्यासंदर्भातील समस्या अल्पावधीतच सोडवण्याचा मनोदय आरोलकर यांनी व्यक्त केला आहे. जे लोकप्रतिनिधी जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नाहीत व त्यांची कामे करीत नाहीत, अशांना आता घरी पाठवण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले. येत्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला मतदान करीत म्हापशात बदल घडवून आणण्यासाठी लोकांनी तृणमूल काँग्रेसला साथ द्यावी, असे आवाहन आरोलकर यांनी केले.
प्रचारावेळी स्थानिक गरीब लोकांच्या डोळ्यांत अश्रू पाहून तारक आरोलकरदेखील भावुक झाले. म्हापशातील लोकांचे असे लहानमोठे विषय सोडवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन. त्यासाठी जनतेने आपला आशीर्वाद निवडणुकीत मला द्यावा, असे आवाहन तारक आरोलकरांनी या वेळी केले.
आरोलकर हे म्हापसा पालिकेच्या प्रभाग सातचे नगरसेवक आहेत. अलीकडेच त्यांनी स्वत:च्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्जही सादर केला आहे. त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार किरण कांदोळकर यांनी आरोलकर यांचे पक्षात स्वागत केले होते.
पक्षासंदर्भात बोलताना आरोलकर म्हणाले, तृणमूल काँग्रेस पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवल्याने मी पक्षाचा आभारी असून म्हापसा मतदारसंघाच्या विकासाठी मी कटिबद्ध आहे. काँग्रेस पक्षाने माझा विश्वासघात केल्यानेच मी टीएमसीत प्रवेश केला आहे. हळदोणेमधून उमेदवारी मिळेल, असे आश्वासन काँग्रेसच्या वरिष्ठांनी मला दिले होते. मात्र, शेवटच्या क्षणी त्या पक्षाने माझा घात केला. काँग्रेसने माझा सोयीस्करपणे स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करून घेतला, असा आरोपही त्यांनी केला.
काँग्रेस हा आता सर्वसामान्यांचा पक्ष राहिलेला नाही. तसेच प्रामाणिक कार्यकर्त्यांना तिथे मान-सन्मान नाही. सुरुवातीपासूनच हळदोणेत मी काँग्रेसाठी काम केले. तिथे पक्षाला नवीन चेहरामोहरा प्राप्त करून दिला. मात्र, शेवटच्या क्षणी पक्षाने भलत्याच व्यक्तीला उमेदवारी दिली. ज्या व्यक्तीचे हळदोणात काहीच सामाजिक कार्य नाही, अशा व्यक्तीला पक्ष तिथे उमेदवारी देते, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. यातून काँग्रेसची मानसिकता लक्षात येते, अशी टीकाही आरोलकर यांनी केली.
म्हापशातील प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवणार:
म्हापसा मतदारसंघाविषयी तारक आरोलकर म्हणाले, आजही म्हापशात पायाभूत सुविधांची कमतरता आहे. मतदारसंघात सुसज्ज बसस्थानकाचा अभाव असून, म्हापसावासीय रवींद्र भवनाच्या प्रतीक्षेत आहेत. म्हापसा शहर ही गोव्याची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. परंतु, बाजारपेठेच्या सौंदर्यीकरणचा विषय दीर्घ काळ खितपत पडलेला आहे. याशिवाय तार नदीच्या प्रदूषणाचा विषय अद्याप सरकारला योग्यरीत्या हाताळता आला नाही. म्हापसा शहरातील मलनिस्सारण प्रकल्पाचे काम अर्धवट स्थितीत आहे. मी निवडून येताच, असे सर्व प्रकल्प मार्गी लावून अन्य सर्व प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहणार आहे.
वृद्धेनेही दिला आशीर्वाद:
म्हापशातील तृणमूल काँग्रेसचे उमेदवार तथा नगरसेवक अॅड. तारक आरोलकर यांनी मतदारसंघातील घरोघरी प्रचारास सुरुवात केल्यानंतर त्यांना जनतेचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय अनेक जण आरोलकार यांच्यासमोर स्वत:ची गार्हाणी मांडत स्थानिक आमदार जोशुआ डिसोझा यांच्याप्रति रोष व्यक्त करीत आहेत. प्रचारावेळी एका वृद्धेने स्वत:च्या घरातील समस्यां अॅड. आरोलकरांसमोर कथन केल्या. आपल्या घरात शौचालय बांधून देण्याची मागणी तिने केली. याशिवाय आपल्या मुलीच्या लग्नासाठी मदत करावी, अशी विनंती तिने केली. आपण दोन्ही कामे पूर्ण करून देणार, असे आश्वासन देत आरोलकर यांनी त्या महिलेला धीर दिला. असेच तुम्ही गोरगरीबांच्या पाठीशी उभे राहा, माझ्यासारखी संपूर्ण म्हापशातील जनता तुमच्या पाठीशी खंबीररीत्या उभी राहील, असा शब्दांत या वृद्धेने तारक आरोलकांना आपला आशीर्वाद दिला.
त्या वृद्धेने सांगितले की, हा विषयी स्थानिक आमदार जोशुआ डिसोझा यांच्यासमोर अनेकदा मांडला. मात्र, आमदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळला नाही. तुमचे प्रश्न आपल्या कार्यालयात येऊन मांडा, मी बघतो असेच उत्तर त्यांच्याकडून प्रत्येक वेळी मिळते. आमदार जोशुआ आमच्यासाठी काहीच करीत नाहीत, अशी खंत त्या महिलेने आरोलकर यांच्याकडे बोलून दाखवली.
बसस्थानकाच्या निकृष्ट कामाबाबत निषेध:
तारक आरोलकर म्हणाले, अलीकडेच ६ जानेवारी रोजी म्हापसा येथील नवीन बसस्थानकाचे पहिल्या टप्प्यातील कामाचे उद्घाटन स्थानिक आमदाराच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आहे होते. परंतु ते बसस्थानक उद्घाटनापासून सलग सुमारे वीस दिवस बंद ठेवण्यात आल्याने आम्ही सरकारचा निषेध करीत आहोत. तसेच, ते काम अतिशय निम्न दर्जाचे झाले असून तिथे सर्व अत्यावश्यक सुविधाही उपलब्ध नाहीत. आंतरराज्य बसगाड्या नेमक्या कुठे उभ्या कराव्यात हेही गुलदस्त्यातच आहे, असेही आरोलकर म्हणाले.
…….