वसंत पंचमी

.

वसंत पंचमी

*प्रस्तावना* – माघ महिन्यातील पंचमीला देवी सरस्वती पृथ्वीतलावर अवतरली. त्यामुळे विद्येची देवता सरस्वतीची पूजा या दिवशी केली जाते. तसेच हा दिवस देवी सरस्वती आणि लक्ष्मी यांचा जन्मदिवसही मानला जातो. सर्व ऋतूंचा राजा असणार्‍या वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल वसंत पंचमीच्या दिनी लागत असल्यामुळे या पंचमीला वसंत पंचमी म्हटले जाते. वसंत पंचमी साजरी करण्याला हिंदू धर्मात अनेक मान्यता आहेत. वसंत ऋतू आणि वसंत पंचमीचे महत्त्वही वेगळे आहे. यावर्षी ५ फेब्रुवारी अर्थात माघ शु.प.पंचमी या दिवशी वसंत पंचमी आहे. जाणून घेऊया वसंत पंचमी या उत्सवामागील इतिहास, महत्त्व आणि मान्यता…

*तिथी, इतिहास आणि साजरी करण्याची पद्धत* – वसंत पंचमी हा उत्सव ‘माघ शुद्ध पंचमी या तिथीला साजरा करतात. कामदेव मदनाचा जन्म याच दिवशी झाला, असे म्हटले आहे. दांपत्यजीवन सुखाचे जावे, यासाठी लोक रतिमदनाची पूजा आणि प्रार्थना करत असत. वसंत पंचमी या तिथीला सरस्वतीदेवी उत्पन्न झाली; म्हणून तिची पूजा करतात, तसेच लक्ष्मीचाही हा जन्मदिन मानला जातो; म्हणून या तिथीला ‘श्रीपंचमी’ असेही म्हणतात. या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करून पूजा करतात. वसंत पंचमी या दिवशी वाणीची अधिष्ठात्री देवी सरस्वती हिची पूजा आणि प्रार्थना करण्याचे महत्त्व आहे. ब्राह्मणग्रंथांनुसार वाग्देवी सरस्वती ब्रह्मस्वरूपा, कामधेनु आणि समस्त देव यांची प्रतिनिधी आहे. तीच विद्या, बुद्धी आणि ज्ञान यांची देवी आहे. अमित तेजस्विनी आणि अनंत गुणशालिनी देवी सरस्वतीची पूजा अन् आराधना यांसाठी माघ मासातील पंचमी ही तिथी निश्‍चित केली गेली आहे. हा दिवस देवीचा प्रकटदिन म्हणून मानला जातो. या दिवशी कलशाची स्थापना करून त्यात सरस्वतीदेवीला आवाहन करून तिचे पूजन केले जाते.

*सरस्वती देवी पृथ्वीवर अवतरली* – सृष्टीचे निर्माणकर्ता ब्रह्म देवांनी जेव्हा जीव आणि मनुष्यांची रचना केली. मात्र, निर्माण केलेल्या सृष्टीकडे पाहिल्यावर ती निस्तेज असल्याचे त्यांना जाणवले. वातावरण अतिशय शांत होते. त्यात कुठलाही आवाज वा वाणी नव्हती. त्यावेळी विष्णू देवाच्या आज्ञेवरून ब्रह्म देवांनी आपल्या कमंडलातील पाणी पृथ्वीवर शिंपडले. भूमीवर पडलेल्या त्या पाण्यामुळे पृथ्वी कंप पावली आणि एक अद्भुत शक्तीच्या रूपात चतुर्भुजी सुंदर स्त्री प्रकट झाली.त्या देवीच्या एका हातात वीणा, दुसरा हात वर मुद्रेत आणि इतर दोन हातात पुस्तके आणि माळ होती. ब्रह्म देवाने त्या स्त्रीला वीणा वाजवण्याचा आग्रह केला. वीणेच्या सुरांमुळे पृथ्वीवरील सर्व जीवांना, मनुष्याला वाणी प्राप्त झाली. त्या क्षणानंतर देवीला सरस्वती असे म्हटले गेले. सरस्वती देवीने वाणीसह विद्या आणि बुद्धी सर्व जीवांना दिली. माघ महिन्यातील पंचमीला ही घटना घडल्यामुळे सरस्वतीचा जन्मोत्सव रूपात ही पंचमी साजरी केली जाते, अशी मान्यता आहे. या देवीला बागीश्वरी, भगवती, शारदा, वीणावादनी आणि वाग्देवी, अशी अनेक नावे आहेत. संगीताची उत्पत्ती केल्यामुळे संगीताची देवी म्हणूनही तिचे पूजन केले जाते. विद्या, बुद्धी देणाऱ्या सरस्वती देवीची पूजा वसंत पंचमीच्या दिवशी केली जाते.

*सरस्वतीदेवीचे पूजन करण्याच्या पद्धती*  वसंतपंचमीचा हा दिवस सरस्वतीदेवीच्या साधनेसाठीच अर्पण केला जातो. शास्त्रांमध्ये भगवती सरस्वतीची आराधना वैयक्तिक स्वरूपात करण्याचे विधान आहे; पण सध्या सार्वजनिक पूजामंडपांत देवी सरस्वतीची मूर्ती स्थापन करून तिची पूजा करण्याचा प्रघात चालू झाला आहे. हा ज्ञानाचा सण असल्यामुळे विद्यार्थी शिक्षण संस्थेची सजावट करतात. विद्यारंभ संस्कारासाठी हा सर्वोत्कृष्ट मुहूर्त आणि दिवस असतो.

*नवीन कार्यासाठी शुभदिवस* – वसंतपंचमी हा सर्व प्रकारच्या शुभकार्यांसाठी अत्यंत शुभमुहूर्त मानला गेला आहे. यांत प्रामुख्यानेे नवी विद्याप्राप्ती आणि गृहप्रवेश यांसाठी वसंतपंचमीला पुराणांतही अतिशय श्रेयस्कर मानले गेले आहे. वसंतपंचमीला शुभमुहूर्त मानण्यामागे अनेक कारणे आहेत. हे पर्व बहुतेक वेळा माघ मासातच येते. माघ मासाचे धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टीनेही विशेष महत्त्व आहे. या मासात ‘पवित्र तीर्थक्षेत्री स्नान करणे’, हे विशेष महत्त्वाचे मानले गेले आहे.

*सूर्य मंदिरातील वसंतोत्सव* – बिहार राज्यातल्या औरंगाबाद जिल्ह्यातील देव नावाच्या गावामधील सूर्य मंदिरात असलेली देवतेची मूर्ती ही वसंत पंचमीच्या दिवशी स्थापन झाली असे मानले जाते. या दिवशी देवतेला स्नान घालतात आणि तिला जुनी वस्त्रे काढून नवी लाल वस्त्रे नेसवतात. भाविक मंडळी या दिवशी गीत, संगीत, नृत्य यांचे सादरीकरण करतात.

*वसंत पंचमी या उत्सवाचा उद्देश* – या दिवशी सृष्टीतील नवचैतन्य आणि नवनिर्माण यांच्यामुळे झालेला आनंद प्रकट करणे आणि मौज करणे, हा या उत्सवाचा उद्देश आहे. वसंत पंचमीचा कृषी संस्कृतीशी संबंध दिसून येतो. या दिवशी नवान्न इष्टी असा एक छोटा यज्ञ करतात. शेतात तयार झालेल्या नवीन पिकाच्या लोंब्या घरात आणून त्या देवाला अर्पण करतात. मथुरा, वृंदावन, राजस्थान या भागात या दिवशी विशेष उत्सव साजरा केला जातो. या दिवशी गणपती, इंद्र, शिव आणि सूर्य यांची प्रार्थनाही होते.वसंत ऋतूमध्ये वृक्षलतांना नवी पालवी फुटते. ते पानाफुलांनी बहरतात. निसर्गाच्या या बदलत्या स्वरुपामुळे मनुष्याची मनोवृत्तीही उत्साही व आनंदी होते. हा उत्सव ह्या संक्रमणस्थितीचा द्योतक आहे. वसंत पंचमीचा दिवस हा कुंभमेळाप्रसंगी विशेष पवित्र मानला जातो. या दिवशी कुंभमेळ्यात शाही स्नान होते.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar