कळंगुट मतदार संघातील लोकांनी गर्विष्ठ लोकप्रतिनिधी हवा की लोकांना सोबत घेऊन जाणारा नेता हवा हे येथील लोकांनी ठरवायचे आहे. येथील लोकांना कोणाच्याही धमक्यांना घाबरण्याची गरज नाही.या निवडणुकीमुळे पुढील पिढीचे भाग्य ठरणार आहे, त्यामुळे लोकांनी योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. आता परिवर्तनाची वेळ आली आहे असे प्रतिपादन महारष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते तथा गोव्याचे भाजपा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी केले.
कळंगुट मतदार संघाचे भाजपा उमेदवार जोसेफ सिक्वेरा यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उदघाट्न देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कर्नाटक चे मंत्री प्रभू चव्हाण, कर्नाटकचे आमदार बसवराज, पंढरपूरचे आमदार समाधान अवकाळे, गोव्याचे माजी मंत्री दिलीप परुळेकर, कळंगुट भाजपा मंडळ अध्यक्ष यशवंत कांदोळकर, भाजपा नेते गुरूदास शिरोडकर, गुरुप्रसाद पावसकर, उत्तर गोवा भाजपा अध्यक्ष महानंद अस्नोडकर, कळंगुट, कांदोळी पंचायतीचे समर्थक पंचसदस्य उपस्थित होते.
डबल इंजिन सरकारमुळे गोव्याचा सार्वभौम विकास झालेला आहे.मनोहर पर्रीकरापासून ते प्रमोद सावंत सरकार मुळे गोव्याचा चेहरा मोहरा बदलला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याला भरघोस मदत दिल्याने जागतिक दर्जाच्या मूलभूत साधन सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. लवकरच तयार होणाऱ्या मोपा विमानतळामुळे गोव्याचे संपूर्ण चित्र बदलणार आहे. गोव्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास व्यक्त करून उमेदवार जोसेफ सिक्वेरा यांचा विजय निश्चित असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
कळंगुटच्या माजी आमदाराने आपल्या फायद्यासाठी कळंगुटला पीडीए आणली. त्याला 2012 मध्ये आपण सहकार्य करून निवडून आणले होते, पण निवडून आल्यानंतर त्याने आमचे रक्त शोषण सुरू केले. किनाऱ्यावरील घरे कायदेशीर करण्याचे लोकांना फसवे आस्वासन देऊन फक्त आपले बेकायदा हॉटेल कायदेशीर करून घेतले. आपल्या तक्रारी नंतर लोकांयुक्तानी मायकल लोबो हे आमदार म्हणून अयोग्य आहेत असा शेरा मारला होता, त्या आधारावर त्यांना बडतर्फ करून पुढील पाच वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी येणार म्हणून मायकल लोबो याने राजीनामा देऊन पळवाट काढली. या माजी आमदारामुळे कळंगुट मध्ये अनैतिक व्यवहारमुळे कळंगुट चे नाव बदनाम झाले असा आरोप उमेदवार जोसेफ सिक्वेरा यांनी यावेळी बोलताना केला.
यावेळी दिलीप परुळेकर, कर्नाटकचे मंत्री प्रभू चव्हाण यांनीही उमेदवार जोसेफ सिक्वेरा यांच्या विजयाची खात्री दिली.