पणजी : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी त्यांच्या गोवा दौऱ्यावर असताना भाजप सरकार सर्व स्थरांवर अपयशी ठरल्याचे म्हटले. भाजपने केवळ सत्ता टिकवण्यावर लक्ष केंद्रित करून गोव्याचे समृद्ध पर्यावरण, समृद्ध संसाधने आणि समृद्ध कौशल्याचा ऱ्हास केल्याबद्दल भाजपवर टिका केली आणि थ्री लिनियर प्रकल्प रद्द करून, कोळसा हब रद्द करून, लाभदायक धोरणे राबवून आणि राज्याच्या नैसर्गिक सौंदर्याचे संरक्षण करून गोमंतकियांचा समृद्ध गोवा परत आणण्याचे आश्वासन दिले.
प्रियंका गांधी यांनी सोमवारी माजोर्डा, नुवे, नावेली, सांत आंद्रे, सांता क्रुझ, कुंभारजुवा आणि पणजी येथे सभांना संबोधित केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, जीपीसीसी अध्यक्ष गिरीश चोडणकर, युवा अध्यक्ष अॅड. वरद म्हार्दोळकर व संबंधित मतदारसंघातील उमेदवार यावेळी उपस्थित होते. नुवेचे उमेदवार आलेक्स सिक्वेरा, नावेलीचे उमेदवार आवेर्तान फुर्तादो, सांत आंद्रेचे उमेदवार अँथनी फर्नांडिस, सांता क्रुझचे उमेदवार रुडोल्फ फेर्नांडीस, कुंभारजुवेचे उमेदवार राजेश फळदेसाई आणि पणजीचे उमेदवार एल्विस गोम्स यावेळी उपस्थित होते.
“”गोव्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. गोवा संसाधने, नैसर्गिक सौंदर्य, कौशल्य आणि पर्यावरणाने समृद्ध आहे. मात्र, त्यांचे संरक्षण करण्यात आणि गोवावासीयांना मदत करण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. भाजपने सुरुवातीला चुकीच्या मार्गाने सत्ता बळकावली आणि पक्षांतराला प्रोत्साहन दिले आणि नंतर केवळ सत्तेत राहण्यावर लक्ष केंद्रित केले. अशा प्रकारे गोव्याच्या मुख्य प्रश्नांना बगल दिली आणि नको असलेले प्रकल्प लादले.’’ असे प्रियांका गांधी म्हणाल्या.
कोविड गैरव्यवस्थापना मुळे आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रूग्णांचा मृत्यू झाला, असे गांधी म्हणाले. “कोविड नंतरही भाजप अपयशी ठरला. कोविड आणि लॉकडाऊनमुळे गोव्याच्या पर्यटनावर वाईट परिणाम झाला. मात्र, भाजप सरकारने त्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे गोव्यातील लोकांना त्रास सहन करावा लागला आणि अर्थव्यवस्था कोलमडली.’’ असे त्या म्हणाल्या.
गोव्यात महिलांवरील गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून भाजपच्या मंत्र्याचा सेक्स स्कँडलमध्ये सहभाग असल्याची घटना अस्वीकार्य असल्याचे त्या म्हणाल्या. ‘‘महिलांना राजकारणात आणण्यासाठी मी खूप मेहनत घेत आहे. कारण महिला राजकारणात सकारात्मकता आणू शकतात, ज्याची खरी गरज आहे.’’ असे गांधी म्हणाल्या. महिलांना ३० टक्के सरकारी नोकऱ्या आणि नोकरदार महिलांसाठी वसतिगृहे देण्याचे आश्वासन देणाऱ्या काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे त्यांनी स्वागत केले.
पी चिदंबरम यांनी गोव्यातील जनतेला त्यांच्या कुटुंबाच्या आणि स्वतःच्या भविष्याचा विचार करण्याचे आवाहन केले. “गोव्यात भाजप विरोधात लाट आहे. सर्वांना माहित आहे की काँग्रेस हा एकमेव पर्याय आहे. टीएमसी किंवा आप नाही. मतांचे विभाजन करण्यासाठी हे राजकीय पक्ष गोव्यात दाखल झाले आहेत. त्यांचे गोव्यात तळागाळात कोणतेही काम नाही.’’ असे चिदंबरम म्हणाले.
सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या इच्छेविरुद्ध प्रकल्प राबवले, असे म्हणत त्यांनी भाजपवर टिका केली. “आता भाजपने एमपीटीचा दर्जा बदलला आहे, आणि त्यावर गोव्याचे कायदे लागू होणार नाहीत. भाजप राज्यातच राज्य निर्माण करत आहे.’’ असे ते म्हणाले.
चिदंबरम यांनी १६ ब कलम रद्द करण्याचे आणि कोल हब रद्द करण्याचे आश्वासन दिले. “आम्ही अधिकाधिक पोलिस स्टेशन स्थापन करून व महिला पोलिसांची भरती करुन महिलांची सुरक्षा वाढवण्यावर भर देणार.’’ असे ते म्हणाले.
गिरीश चोडणकर म्हणाले की, काँग्रेसने आश्वासन दिल्याप्रमाणे पक्षांतर करणाऱ्यांना तिकीट दिलेले नाही. “भाजपने लोकशाहीची हत्त्या केली आहे आणि यासाठी त्यांच्या उमेदवारांना घरी पाठवण्याची गरज आहे.” असे ते म्हणाले.