सुमधुर आवाजाची दैवी देणगी लाभलेल्या आणि गायनाविषयी भाव असणार्‍या भारतरत्न स्व. लता मंगेशकर

.

 

‘गाणे म्हटले की, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे रूप डोळ्यांसमोर येते. ‘लताताई म्हणजे गाणे !’, असे त्यांचे संगीताशी समीकरण जुळले होते’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. स्वतःच्या सुमधुर आवाजाने संपूर्ण जगाला मोहित करणार्‍या गानसम्राज्ञी लता मंगेशकर (लताताई) यांचे जीवन आणि संगीत यांचा प्रवासही तेवढाच आव्हानात्मक होता. त्यांनी कठीण प्रसंगांना सामोरे जाऊन घर सांभाळून संगीताची इमारत उभारली होती. त्यांनी मराठी आणि हिंदी यांसह विविध भाषांमधून गायन केलेले आहे. त्यांना ‘फिल्मफेअर’, पद्मभूषण, पद्मविभूषण या पुरस्कारांसह ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरिक पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. एवढेच नाही, तर वर्ष १९८९ मध्ये भारत सरकारने त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘दादासाहेब फाळके’ हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान केला. अशा अनेक उच्च पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या आहेत. दैवी आवाजाची देणगी लाभलेल्या लताताईंचे ६ फेब्रुवारी २०२२ या दिवशी निधन झाले. लताताईंच्या या संगीतमय वाटचालीतील विविध पैलूंवर प्रकाश टाकणार्‍या या लेखाच्या माध्यमातून महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय स्व. लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करत आहे.

१. आई-वडिलांमुळे लताताईंवर बालपणापासून धार्मिक संस्कार होणे
लता मंगेशकर यांचा जन्म २८.९.१९२९ या दिवशी मध्यप्रदेशमधील इंदूर या गावी झाला. सुप्रसिद्ध गायक मास्टर दीनानाथ मंगेशकर हे त्यांचे वडील होत. आई-वडिलांच्या संस्कारांमुळे ताईंचे राहणीमान साधे होते. त्यांची आईसुद्धा (माई मंगेशकरसुद्धा) धार्मिक वृत्तीची होती. त्यांचे वडील स्वतः रात्री ‘हरिविजय’ आणि ‘रामविजय’ हे ग्रंथ वाचायचे अन् लताताईंना ऐकवायचे. ग्रंथात श्रीकृष्ण आणि श्रीराम यांच्याविषयीचे वाक्य आले की, वडिलांच्या डोळ्यांत पाणी यायचे. वडिलांंमुळे लताताई आणि त्यांची भावंडे (मीना खडीकर, आशा भोसले, उषा मंगेशकर आणि पं. हृदयनाथ मंगेशकर) यांच्यावर धार्मिक संस्कार झाले. लताताई नेहमी रामरक्षा आणि इतर स्तोत्रेही वाचत असत.

२. २० व्या शतकात मुलींना घराबाहेर पडणे अवघड असतांना मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी लताताईंना गाण्याचे शिक्षण देणे आणि लताताईंनीही ‘मंगेशकर’ घराण्याचे नाव उज्ज्वल करून दाखवणे
लताताईंना वडिलांकडून लहानपणापासूनच गायनाचे धडे मिळाले. लहानपणापासूनच त्यांचे वडील त्यांना स्वरांची माहिती द्यायचे. एकदा त्यांचे वडील त्यांच्या शिष्याला संगीताचा रियाज (सराव) करायला सांगून बाहेर गेले. चिमुकली लता बाहेर खेळत होती. वडील त्या शिष्यांना शास्त्रीय संगीत शिकवत असतांना खेळता खेळता तिने ते ऐकले होते. ‘तो शिष्य रियाज करत असतांना चुकत आहे’, हे बाहेर खेळणार्‍या चिमुकल्या लताला कळले आणि तिने तो राग त्या शिष्याला अचूक गाऊन दाखवला. तिचे हे गायन बाहेर असलेल्या मास्टर दिनानाथ यांनी ऐकले. दुसर्‍या दिवशी सकाळी चिमुकल्या लताला उठवून मास्टर दीनानाथ यांनी तिला शास्त्रीय संगीताचे शिक्षण देण्यास आरंभ केला. वर्ष १९३८ – ३९ मध्ये ९ वर्षांच्या लताताईंनी त्यांच्या वडिलांच्या समवेत थिएटरमध्ये शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम केले.

‘लताताई म्हणजे संगीत क्षेत्रातील एक अद्भुत चमत्कार आहे’, याची जाणीव त्यांच्या वडिलांना त्यांच्या लहानपणीच झाली होती. २० व्या शतकात मुलींना घराबाहेर पडणे अवघड होते. त्या परिस्थितीतही लताताईंच्या वडिलांनी त्यांना गाण्याचे शिक्षण दिले आणि लताताईंनीही ‘मंगेशकर’ घराण्याचे नाव उज्ज्वल करून दाखवले. मास्टर दीनानाथ यांना लताताईंच्या गाण्यावर पुष्कळ विश्‍वास होता. वडील गेल्यावरही लताताईंना ‘बाबा माझ्या पाठीशी आहेत’, असे नेहमी वाटायचे.

३. लताताईंना तरुण वयात एक स्वप्न पडणे आणि ‘त्याचा अर्थ ‘तुला देवाचा आशीर्वाद असून एक दिवस तू मोठी होशील’, असा असल्याचे त्यांची आई अन् आजी यांनी सांगणे
लताताई साधारण २० वर्षांच्या असतांना त्यांना सतत एक स्वप्न पडायचे. त्यात त्यांना ‘त्या मंदिराच्या पायर्‍यांवर बसल्या आहेत आणि खालून समुद्राच्या लाटा येऊन त्यांच्या पायाला स्पर्श करत आहेत’, असे दिसायचे. त्या वेळी ताईंची आई आणि आजी यांनी ताईंना सांगितले होते, ‘‘याचा अर्थ ‘तुला देवाचा आशीर्वाद आहे. एक दिवस तू मोठी होशील’, असा आहे.’’

*४. लताताईंच्या दैवी आवाजाची वैशिष्ट्ये*

*४ अ. ज्या जास्तीत जास्त उंचीपर्यंत मानवी आवाज पोचू शकतो, तिथपर्यंत लताताईंचा आवाज सहज पोचणे :* लताताई काळी दोन, तसेच पांढरी चार या स्वरपट्ट्यांमध्ये (टीप) गात असत. एका चित्रपटातील त्यांच्या गाण्यामध्ये एक ओळ पुष्कळ उंच पट्टीतील आहे. ज्या जास्तीत जास्त उंचीपर्यंत मानवी आवाज पोचू शकतो, तिथपर्यंत त्यांचा आवाज सहज जात असे. त्या सप्तकाच्या शेवटच्या ठिकाणास स्पर्श केला, तरीही तेथे स्थिर राहून विचलित न होण्याची किमया साधणारा त्यांचा अद्भुत आवाज होता.
(*टीप :* सा, रे, ग, म, प, ध, नी या सात स्वरांच्या समूहास ‘सप्तक’ असे म्हणतात. वेगवेगळ्या सप्तकातील स्वर वेगवेगळ्या उंचीवर म्हटले जातात. हार्मोनियमवरील ज्या काळ्या किंवा पांढर्‍या पट्टीच्या वरचे आणि खालचे स्वर गायक सहज म्हणू शकतो, ती गायकाची पट्टी असते.)

४ आ. संगीतातील सर्व प्रकारचे अलंकार आपल्या अलौकिक आवाजातून उमटवण्याची त्यांची अजोड क्षमता होती.

४ इ.त्यांची ग्रहणशक्ती असामान्य होती.

४ ई. ‘लताच्या गळ्यात गंधार आहे’, असे लताताईंचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर म्हणायचे.

४ उ. एका लेखकाने लताताईंच्या आवाजाचे केलेले वर्णन : ‘शब्दार्थाच्या पलीकडील तरल संवेदनेच्या भावविश्‍वात नेणारा अलौकिक सूर, त्या त्या भाषेच्या वैशिष्ट्यानुसार आणि प्रकृतीधर्मानुसार केलेले स्वच्छ, स्पष्ट आणि अर्थपूर्ण शब्दोच्चार, लयीची सखोल अन् अत्यंत परिपक्व जाण, सूर, ताल आणि लय यांवर अलौकिक प्रभुत्व’, अशा उत्तम गुणांचा संगम लताताईंच्या अद्भुत गाण्यात आढळतो.

४ ऊ. प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक मेहबूब खान गंभीर आजारी असतांना लताताईंचे गाणे ऐकल्यावर त्यांना शांतता आणि समाधान वाटणे : प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक मेहबूब खान गंभीर आजारी होते. त्या वेळी त्यांच्या अंतिम काळात त्यांनी रुग्णालयातून लताताईंना ‘रसिक बलमा…’ हे गाणे दूरभाषवरून ऐकवण्याची विनंती केली होती. हे गाणे ऐकल्यावर त्यांना पुष्कळ शांतता आणि समाधान मिळत असे.

४ ए.कोणतेही वेगळे प्रयत्न न करता संगीतातील सर्व श्रुति अचूक लागणे : *लताताईंच्या संगीतातील सर्व (२२) श्रुति (नादाचा सूक्ष्मतम आविष्कार) अचूक लागायच्या. एकदा एका मुलाखतीमध्ये त्यांना अचूक श्रुति लागण्याविषयी प्रश्‍न विचारण्यात आला. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘माझ्या गळ्यातून ते आपोआप अचूक निघून जाते. मला वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत.’’ (*‘यावरून त्यांचा सूर दैवी असल्याचे लक्षात येते.’* – संकलक)

५. संगीत क्षेत्रातील मोठ्या कलाकारांनी लताताईंच्या गायनाविषयी काढलेले गौरवोद्गार
अ.लताताईंचे गुरु अमानत खान साहेब यांनी संगीतकार सज्जाद हुसेन यांना सांगितले, ‘‘माझी ‘लता’ नावाची एक विद्यार्थिनी आहे. ती अतिशय हुशार असून काहीही चटकन आत्मसात करणारी आहे. कुठलीही तान आणि मुरकी (टीप २) ती कधी चुकत नाही.’’

टीप २ – एका स्वराकडून दुसर्‍या स्वराकडे झटकन वळणे

आ. संगीतकार सज्जाद हुसेन हे परखड आणि फटकळ बोलण्यासाठी प्रसिद्ध होते; मात्र लताताईंविषयी ते म्हणायचे, ‘‘एक लता गाती है, बाकी सब रोती हैं ।’’

इ. एका चित्रीकरणाच्या वेळी प्रसिद्ध अभिनेत्री नूरजहां यांची लताताईंशी भेट झाली. तेव्हा त्यांनी ताईंना ‘तू पुढे पुष्कळ मोठी गायिका होशील’, असा आशीर्वाद दिला.

ई. एका रात्री उस्ताद बडे अली खान आकाशवाणीवरील लताताईंनी गायलेले एक चित्रपट गीत ऐकत होते. तेव्हा त्यांनी ‘ये लडकी कभी बेसुरी नहीं होती ।’, असे प्रशंसेचे उद्गार काढले.

६. लताताईंच्या आवाजाविषयी अमेरिकी वैज्ञानिकांनी केलेले संशोधन
लताताईंच्या आवाजावर अमेरिकी वैज्ञानिकांनी संशोधन केले आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘लता मंगेशकरांच्या आवाजाइतका सुरेल आवाज यापूर्वी नव्हता आणि येणार्‍या काळातही असण्याची शक्यता फारच अल्प आहे.’ यावरून लताताईंच्या आवाजाचा दैवीपणा लक्षात येतो.

७. लता मंगेशकर यांची गुणवैशिष्ट्ये
७ अ.लताताई म्हणत, ‘‘मी झगमगटापासून लांब आहे’, यात मला आनंद आहे. मला साधे रहायला आवडते.’’

७ आ.आत्मविश्‍वास : लहानपणी त्यांच्या वडिलांच्या समवेत त्याही नाटकात काम करायच्या. एका नाटकात त्यांच्या वडिलांच्या गाण्यानंतर लताताईंचे गायन होते. गायला जातांना त्या त्यांच्या वडिलांना म्हणाल्या, ‘‘बाबा, पहा मी या गाण्याला ‘वन्स मोअर’ (पुन्हा एकदा गा.) घेऊन येणार’’ आणि खरेच त्या गाण्याला प्रेक्षकांनी ‘वन्स मोअर’ दिला.

७ इ. वडील गेल्यानंतर घराचे दायित्व सांभाळणे :लताताईंचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे ज्या दिवशी निधन झाले, त्या दिवशी त्यांनी त्यांच्या आईला दायित्वाने विचारले, ‘‘मला नोकरी कुठे मिळेल ? मी आता हे घर कसे सांभाळू ?’’ त्या वेळी निराश न होता समंजसपणाने त्या या प्रसंगाला सामोर्‍या गेल्या आणि त्यांनी लगेच ‘कुटुंबप्रमुख’ म्हणून दायित्व सांभाळले.

७ ई. व्यासपिठाचा सन्मान करणे : आपली पादत्राणे व्यासपिठाखाली काढूनच त्या व्यासपिठावर जायच्या. अशा प्रकारे त्या व्यासपिठाचा नेहमी सन्मान करायच्या. (‘सध्याचे काही कलाकार व्यासपिठावर चप्पल आणि बूट घालून जातात. या कलाकारांनी लताताईंचा आदर्श समोर ठेवायला हवा !’ – संकलक)

७ उ. यशाचे श्रेय देवाला आणि वडिलांना देणे :एकदा लताताईंना विचारले, ‘‘तुम्ही तुमच्या यशाचे श्रेय कोणाला देता ?’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘देवाला आणि वडिलांना देते.’’

८. लताताईंचा गायनाविषयीचा भाव !
अ. ‘मी माझ्या आतील देवाला संतुष्ट करण्यासाठी गाते’, असा त्यांचा भाव असायचा. ‘प्रथम देवाला संतुष्ट करा, म्हणजे आपोआप गाण्याचा आनंद जगाला मिळेल’, असे त्यांना वाटायचे.

आ. अध्यात्माची बैठक असल्याविना संगीत होऊच शकत नाही; कारण सूर हाच एक ‘ॐ’कार आहे. तो जेथे नसेल, तेथे संगीत फार काळ टिकू शकत नाही. संगीताचा कुठलाही प्रकार घ्या, उदा. भावगीत आणि सुगमगीत यांनाही ईश्‍वराचे अधिष्ठान आवश्यक आहे; कारण संगीताची देवी ही ‘सरस्वतीदेवी’ आहे.

९. लताताईंना गायन करतांना आलेली अनुभूती
एकदा लताताईंना ताप आलेला असतांनाही त्यांनी संत मीराबाईंचे गाणे गायले होते. त्या वेळी त्यांना ‘स्वतःला ताप आहे’, याचेही भान नव्हते. त्यांना ‘आपण मीराबाईंच्या आसपास आहोत’, असे जाणवत होते.

१०. लता मंगेशकर यांनी व्यक्त केलेली इच्छा !
‘संपूर्ण आयुष्य मी शास्त्रीय संगीत गाऊ शकले नाही’, याची मला खंत वाटते. ‘मला पुढचा जन्म भारतातच, तोही महाराष्ट्रात आणि ब्राह्मण कुळातच मिळावा’, अशी इच्छा त्यांनी एका मुलाखतीच्या वेळी व्यक्त केली होती.’

– कु. तेजल पात्रीकर (संगीत विशारद, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) आणि सौ. अनघा शशांक जोशी, (बी.ए. (संगीत), आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (६.२.२०२२) ०

लताताईंना अश्‍लील गाणी गाण्यापेक्षा साधी आणि आध्यात्मिक बैठक असलेली गाणी गायला आवडणे
लताताईंनी संत तुकाराम महाराजांचे अभंग, श्रीमद्भगवद्गीतेचे अध्याय, मीराबाईंची भजने इत्यादींचे गायनही केले आहे. लताताईंना संतांच्या रचना गायला पुष्कळ आवडायचे. त्यांना संत मीराबाईंचे लहानपणापासून वेड होते. समर्थ रामदासस्वामी हे लताताईंचे श्रद्धेय होते. मनाचे श्‍लोक, दासबोध इत्यादींचे वाचन करतांना ताईंच्या डोळ्यांत नेहमी पाणी तरळायचे.

एका कार्यक्रमात त्यांना ‘तुम्ही साधी गाणीच का गाता ?’, असे विचारण्यात आले. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘मला अश्‍लील गाणी गायची आतूनच इच्छा होत नाही.’’

एकदा मुलाखतीला उत्तर देतांना त्या म्हणाल्या, ‘‘इतर गाण्यांपेक्षा ज्ञानेश्‍वरीतील ओव्या, गीतेतील श्‍लोक आणि संत मीराबाई यांचे अभंग गाण्यात माझे मन अधिक रमते. मला आध्यात्मिक बैठक असलेली गाणी म्हणायला पुष्कळ आवडते. मी इतर गाणी केवळ व्यवसाय म्हणून गाते. पारंपारिक आणि आध्यात्मिक गीते गातांना व्यवसाय आणि पैसा माझ्या डोळ्यांसमोर नसतो. त्यामुळे ही गीते म्हणतांना माझ्या मनाला एक वेगळाच आत्मिक आनंद मिळतो.’’

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें