पणजी: काँग्रेसमध्ये सामील झालेल्या आप आणि टीएमसीच्या माजी नेत्यांनी गोव्यातील लोकांना भाजपच्या ’बी टीमना’ बळी पडून मतांचे विभाजन न करण्याचे आवाहन केले आहे. “फक्त काँग्रेसच गोव्याचे रक्षण करू शकते आणि नागरिकांची काळजी घेऊ शकते.” असे ते म्हणाले.
हळदोण येथील आपचे माजी सरचिटणीस ब्रुनो फर्नांडिस आणि टीएमसीचे माजी सचिव सुकूर सेबी मिनेझिस यांनी हळदोणचे उमेदवार अॅड. कार्लूस आल्वारेस फेरेरा, पणजीचे उमेदवार ॲल्विस गोम्स, उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष विजय भिके, हळदोण गटाध्यक्ष आश्विन डिसुझा, निरिक्षक प्रकाश राठोड आणि आयव्हन डिसूझा यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
ब्रुनो फर्नांडिस म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांनी स्वच्छ उमेदवारांना तिकीट देऊन बदल घडवून आणण्याचे आश्वासन दिल्याने त्यांनी आपमध्ये प्रवेश केला होता. “आपने निवडलेल्या उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.” असे ते म्हणाले.
“काँग्रेस हा एकमेव धर्मनिरपेक्ष पक्ष आहे आणि त्याने नेहमीच जनतेच्या हितासाठी काम केले आहे. मी गोव्यातील जनतेला काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करतो. मतांच्या विभाजनाला वाव देऊ नका.” असे फर्नांडिस म्हणाले.
सुकूर सेबी मिनेझीस म्हणाले की, गोव्यासाठी काँग्रेसचे योगदान कौतुकास्पद आहे आणि त्यामुळे लोक या पक्षाकडे आकर्षित होत आहेत. “मी फक्त लोकांना काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करेन. टीएमसी येथे मतांचे विभाजन करण्यासाठी आहे, म्हणून मी त्या पक्षाचा राजीनामा दिला.’’ असे मिनेझिस म्हणाले.
अॅड. कार्लूस आल्वारेस फेरेरा म्हणाले की, या नेत्यांच्या प्रवेशाने काँग्रेस पक्ष वाढण्यास आणि मजबूत होण्यास मदत होईल. ‘काँग्रेस बदलला आहे. हा नवीन काँग्रेस पक्ष आहे.’’ असे ते म्हणाले.
भाजपने नोकऱ्या विकून पात्र उमेदवारांना वंचित ठेवल्याचा आरोप त्यांनी केला.
राठोड म्हणाले की भाजप, आप आणि टीएमसीचे कट्टर कार्यकर्ते काँग्रेसमध्ये सामील होत आहेत कारण त्यांना माहित आहे की केवळ हाच पक्ष गोव्यातील लोकांची सेवा करू शकतो.
ॲल्विस गोम्स म्हणाले की या नेत्यांच्या प्रवेशाने त्यांना मदत होईल. “काँग्रेस पक्ष बहुमताने जिंकत आहे.” असे ते म्हणाले.