शिवोली मतदार संघातील जनता सुज्ञ आहे, ती कधीही फॅमिली राज ला थारा देणार नाहीत. माजी मंत्री मायकल लोबो हे कळंगुट मधून निवडणूक लढवत आहेत तर आपली पत्नी डिलायला लोबो यांना शिवोलीतून उभे केले आहे, काँग्रेस पक्षाकडे जसेकाही शिवोलीतील एकही नेता मिळत नव्हता म्हणून बाहेरून उमेदवार आणावा लागला. बाहेरच्या उमेदवाराला शिवोलीची जनता थारा देणार नाही. कळंगुट मध्ये चाललेले अंमली पदार्थ व्यवसाय, वेश्याव्यवसाय या ठिकाणी यायला नकोत, त्यांना ठाऊक आहे कळंगुट मधील शेतजमिनी संपवल्या गेल्यात, बेकायदा डोंगर कापणी करण्यात आली, भविष्यात शिवोली मध्ये तेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही या करिता शिवोलीच्या जनतेने शिवोलीचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणी योजनाबद्ध विकास करण्यासाठी आम आदमी पक्षाला एक संधी द्यावी असे आवाहन आप चे उमेदवार ऍड. विष्णू नाईक यांनी पत्रकार परिषदेतून केले. यावेळी त्यांच्या सोबत जेष्ठ कार्यकर्ते अवीन फोन्सेका हजर होते.
मायकल लोबो हे कळंगुट व शिवोली या दोन्ही मतदार संघावर राज्य करण्याचे स्वप्न पहात आहेत, हे त्यांचे दिवास्वप्न ठरणार आहे. यदा कदाचित बाहेरचा उमेदवार निवडून आला तर भविष्यात स्थानिक नेत्यांना कधीच संधी मिळणार नाही याचे भान येथील जनतेने ठेवावे असे ऍड. नाईक यांनी सांगितले.
काँग्रेस व भाजपा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, निवडणूक जाहीर होण्याच्या दोन दिवस अगोदर पर्यत मायकल लोबो हे भाजपात होते, आपल्या रक्तात भाजपा असल्याचे त्यांनी सांगितले होते. डायलेसिस ने ते रक्त बदलले का ? असा सवाल करून निवडून आल्यावर मायकल लोबो पुन्हा भाजपात जाणार नाही कशावरून असा प्रश्न अवीन फोन्सेका यांनी यावेळी उपस्थित केला.