पणजी: गोवा वाचवण्यासाठी आणि भाजपच्या भ्रष्ट विषाणूचा नायनाट करण्यासाठी गोव्यातील जनतेने युतीच्या उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षाच्या नेत्यांनी शनिवारी केले.
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्यासह काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव, सुनील कवठणकर, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई आदींनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मतांच्या विभाजनाला वाव देऊ नये, असे आवाहन केले.
‘काँग्रेस पक्ष हा नेहमीच गोवावासीयांचा आवाज राहिला आहे. गोव्यातून गुंडराज, भ्रष्टाचार आणि पक्षांतर संपवायला हवे. केवळ काँग्रेस पक्षच नवीन बदल घडवून आणू शकतो आणि म्हणून मी गोव्यातील जनतेला जबाबदारीने मतदान करण्याचे आवाहन करतो.’’असे दिनेश गुंडू राव म्हणाले.
ते म्हणाले की, पक्षांतर दूर करण्यासाठी पूर्ण बहुमत आवश्यक आहे. “तुमची मते निश्चित करा आणि काँग्रेसला मत द्या.” असे राव म्हणाले.
“आम्ही गोव्याची सेवा केली आहे आणि लोकांच्या मदतीने गोव्याची सेवा करत राहू. आम्ही जाहीरनाम्यात जी काही आश्वासने दिली आहेत ती पूर्ण केली जातील आणि सरकार स्थापन करताना आम्ही वेळ वाया घालवणार नाही.’’ असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी गोव्यात येवून प्रचार केल्याने पक्षाला त्याचा फायदा झाला.
गोव्यातील जनतेने स्थिर सरकार आणि चांगल्या उमेदवारांना मतदान करावे, असे ते म्हणाले.
दिगंबर कामत म्हणाले की, काँग्रेसने नेहमीच लोकांची बाजू एकून घेतली आहे आणि त्यांना प्रत्येक कामात विश्वासात घेतले आहे.
‘‘गोव्यात काँग्रेसच सरकार स्थापन करू शकतो. गोवा फॉरवर्ड पक्षासह आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल.’’ असे कामत म्हणाले.
सरदेसाई म्हणाले की, गोवा भाजपच्या व्हायरसपासून मुक्त झाला पाहिजे. “भाजपने पुन्हा सरकार बनवल्यास ते गोवा विकतील, हे लोकांना माहीत आहे आणि म्हणूनच लोक पुन्हा गोवा मुक्त करण्यासाठी आमच्या युतीला पाठिंबा देत आहेत.” असे सरदेसाई म्हणाले.
“तुमची मते वाया घालवू नका. भाजपसाठी फक्त काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड हेच पर्याय आहेत. त्यामुळे आमच्या युतीच्या उमेदवारांना पाठिंबा द्या. ” असे सरदेसाई म्हणाले.