*स्पोर्ट्स सोसायटी ऑफ गोवातर्फे सौरभी नाईकला मदत*
हल्लीच गोव्यातील गरजू व प्रतिभावंत खेळाडुंना आर्थिक मदत व क्रीडा साहित्य पुरविण्यासाठी स्थापन झालेल्या स्पोर्ट्स सोसायटी ऑफ गोवा तर्फे विश्वकरंडक फिनस्विमिंग स्पर्धेसाठी निवड झालेल्या सौरभी नाईकला आर्थिक मदत देण्यात आली.
पर्वरी येथे झालेल्या एका समारंभात संस्थेचे अध्यक्ष दयानंद भगत यांच्या हस्ते सौरभीला ही मदत सुपुर्द करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष विवेक पेरेरा व सचिव अमेय बेतकेकर हे उपस्थित होते. सर्वांतर्फे तिला स्पर्धेसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.
ही स्पर्धा २५ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत हंगेरी इगर येथे संपन्न होईल. जागतिक पातळीवर फिनस्विमिंग स्पर्धेसाठी गोमंतकातील जलतरणपटूची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अंडरवाॅटर स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे भारतीय संघाची निवड करण्यात आली. सौरभी नाईकसोबत गोव्याच्या मिथीला कारापुरकर, श्रीजा गाड व हंसिका वेळुसकर यांचीही या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
संस्थेचे अध्यक्ष दयानंद भगत यांनी सर्वांना शुभेच्छा देताना गोव्याचे व भारताचे नाव उज्वल करतील अशी खात्री दर्शवली.