म्हापसा दि. 1 ( प्रतिनिधी )
हणजूण ग्रँड चिवार येथे मोठी जलवाहिनी फुटल्याने महाशिवरात्रीच्या दिवशी लोकांना आंघोळीशिवाय रहावे लागले.गेल्या वर्षी मे महिन्यात याच ठिकाणी हीच जलवाहिनी फुटल्याने येथील जनतेला पंधरा दिवस पाण्यासाठी वणवण फिरावे लागले, नळाद्वारे पाणी पुरवठाच होत नसल्याने हाल झाले.
आता पुन्हा तीच जलवाहिनी गेल्यावेळी फुटलेल्या जागेपासून दहा ते पंधरा मीटराच्या अंतरावर फुटल्याने पाणी वाहून शेताला तळ्याचे स्वरूप आले.शुक्रवार दि.26 रोजी ही जलवाहिनी फुटली असावी, त्यानंतर शनिवार व रविवारी अस्नोडा पाणी पुरवठा प्रकल्पात तातडीची दुरुस्ती असल्याने पाणी पुरवठा होणार नसल्याचे जाहीर करण्यात आले असल्याने कोणाच्या लक्षात आले नाही, सोमवारी सकाळी होणारा पाणी पुरवठा न झाल्याने ग्रँड चिवार येथील कपेलच्या समोर रस्त्याच्या बाजूच्या शेतातील जलवाहिनी फुटून शेतात पाणी साचल्याचे लक्षात आले.
काही जागृत नागरिकांनी ही बाब पाणी पुरवठा खात्याच्या अभियंत्याच्या नजरेस आणून दिली. अभियंत्याने लागलीच कारवाई करून सायंकाळ उशीरा पर्यत काम करून फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करून घेतली पण त्यानंतर चाचणी करिता पाणी सोडल्यानंतर रात्रौ पुन्हा ती जलवाहिनी फुटली. मंगळवारी दुपार नंतर या ठिकाणचे जुने सिमेंट चे पाईप बदलून नवीन पाईप घालून जलवाहिनी दुरुस्त करण्यात आल्यानंतर सुरळीत पाणी पुरवठा सुरू झाला.
दरम्यान हणजूण कायसूव पंचायत क्षेत्रात चाळीस वर्षांपूर्वी घालण्यात आलेल्या सिमेंटच्या जलवाहिन्या अतिशय जीर्ण झाल्या आहेत, त्या बदलण्याची गरज आहे, पाणी पुरवठा खात्याने या मार्गावरील सर्व जुन्या जलवाहिन्या लवकरात लवकर बदलाव्यात अशी मागणी पंच सदस्य सुरेंद्र गोवेकर यांनी केली आहे.