पणजी: भाजपने पक्षाच्या समर्थनार्थ असलेल्या उमेदवारांना राजकीय फायदा करुन देण्यासाठी पंचायत प्रभागांची फेररचना आपल्याला हवी तशी करायला सुरुवात केल्याचा आरोप करत, गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर ही प्रक्रिया सुरु करण्याची मागणी केली आहे. ही प्रक्रिया 10 मार्च 2022 पर्यंत पुढे ढकलण्याची मागणी त्यांनी केली आहे.
चोडणकर यांनी यासंदर्भात निवडणूक आयोग पणजी, गोवा राज्य निवडणूक आयुक्त आणि मुख्य सचिवांना पत्रे लिहिली आहेत.
चोडणकर यांच्या म्हणण्यानुसार निवडणूक आचारसंहिता अजूनही लागू आहे कारण अद्याप निकाल जाहीर झालेला नाही, तरीही राज्य निवडणूक आयुक्तांनी आगामी पंचायत निवडणुकीसाठी पंचायत प्रभाग फेररचना प्रक्रिया सुरु केली आहे. “अशावेळी ही प्रक्रिया इतक्या घाईघाईने करण्याची काय गरज आहे, असा प्रश्न गोव्यातील जनतेला पडला आहे.” असे चोडणकर यांनी पत्रात म्हटले आहे.
ते म्हणाले की, गोव्यातील लोक विविध सण साजरे करण्यात व्यस्त असताना राज्य निवडणूक आयोगाने गोव्यातील लोकांना विविध प्रभागांच्या फेररचनेबाबत त्यांच्या हरकती/निरीक्षण/सूचना नोंदविण्यास सांगितले आहे. ते चुकीचे आहे.
“फेररचना प्रक्रिया ही आपल्या लोकशाहीतील एक महत्त्वाची प्रक्रिया आहे कारण ती योग्य उमेदवार निवडण्यासाठी प्रत्येक मतदाराला अधिकार देते.” असे चोडणकर म्हणाले.
भाजपने सत्तेचा गैरवापर करून पालिका निवडणुकीच्या आरक्षण प्रक्रियेत फेरफार केल्याची आठवण त्यांनी करुन दिली. त्यामुळे लोकांना न्यायालयात जावे लागण्यात आले होते.
ते म्हणाले की, गोवा राज्यात सध्याची विधानसभा निवडणूक प्रक्रिया आणि उत्सव संपेपर्यंत पंचायत प्रभागांची फेररचना आणि आरक्षण प्रक्रिया स्थगित ठेवण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाला देण्यात यावी.