गोव्याच्या निवडणुकीची निकालाची उत्सुकता सर्व राजकीय पक्ष, उमेदवारांपासून मतदानात सहभागी झालेल्या सर्व जनतेला लागली आहे कारण यावेळी झालेले मूक मतदान अर्थात सायलेंट वोटिंग. उमेदवारांनी कितीही ठाम पणे सांगितले तरीही शिवोली मतदार संघातील मतदा्रांमध्येंही विजयी कोण होणार या बद्दल जोरदार चर्चा सुरू आहे तरी वरवर फुशारक्या मारणाऱ्या काही कार्यकर्त्यात कही ख़ुशी कही गम असा प्रकार पहावयास मिळतो.
शिवोली मतदार सघात कोण निवडून येणार या बद्दल पैजा लावल्या जात आहेत. यात उमेदवारांचे प्रमुख कार्यकर्ते जोशात आहेत, एका अपक्ष उमेदवाराच्या प्रमुख कार्यकर्त्याने तर आपलाच उमेदवार निवडून येणार याबद्दल एका लाखाची पैज लावली असून त्या पैजेची चर्चा मात्र चविने चघळली जात आहे.
घरोघरी प्रचार करताना सुरवातीला एकाच उमेदवाराकडून पैशाचे वाटप होत असल्याची चर्चा होती पण नंतर अन्य उमेदवाराकडून पैशाबरोबर मिक्सर फ्रिज सारख्या वस्तूही मतदारांना आकर्षित करण्याकरिता ठराविक जणांना देण्यात आले, शेवटच्या दिवसात तर काही खास मतदारांना पंधरा हजार रुपये देण्यात आल्याचे सांगितले जाते.सर्वात जास्त चंगळ झाली ती टॅक्सी व्यवसायिकांची, मीटरच्या नावाने चार ते पाच उमेदवारांनी प्रत्येकी दहा हजार रुपये दिले. एका अपक्ष उमेदवाराने मतदारांना देण्यासाठी समर्थकच्या घरात ठेवलेले मिक्सर भरारी
पथकाची धाड पडल्यानंतर नाल्यात टाकण्यात आल्याने सर्वत्र बरीच चर्चा रंगली.
एवढे करूनही आपणच विजयी होणार असे छातीठोक पणे सांगितले जात असले तरी खरी लढत काँग्रेस व भाजपात असल्याचे जाणकार सांगतात, दोन्ही पैकी विजयी होणाऱ्या उमेदवारास आघाडी मात्र जास्त मिळण्याची शक्यता कमी असून दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातील संभाव्य दोन उमेदवारापैकी एक विजयी झाल्यास बदला घेण्याच्या सत्राबरोबरच पुत्राची दादागिरी वाढेल अशीही भीती व्यक्त केली जात आहे तर दुसरा उमेदवार विजयी झाल्यास विकास तर होईल पण डोंगर जमीनी वाचणार नाहीत अशी भीती काहीजण व्यक्त करतात. या शिवोली मतदार संघाचा इतिहास पाहता एकदा पराभूत झालेला उमेदवार पुन्हा निवडून येत नाही पण इतिहासाची पुनरावृत्ती होईल की नाही हे येणारा काळच ठरवेल.