ऐन मार्च महिना सुरू झाला,मात्र हरमलात पाणी टंचाईची समस्या उग्रपणे जाणवू लागली.अधिकतर भागांत चार- पाच दिवस पाणी न आल्याने ‘पाणी साठा’ करण्याकडे नागरिकांनी पावले टाकली आहे.
कित्येकांनी नळजोडणी तर काहींनी बोअरवेल खोदल्या,मात्र विदेशी पर्यटक प्लास्टिक बॅरल खरेदी करतात,अशी परिस्थिती आहे.
काल एक विदेशी पर्यटक कुटुंबाने ‘प्लास्टिक बॅरल’कडे खरेदीसाठी मोर्चा वळविला.खालचा- वाडा भागांत राहणाऱ्या ‘त्या’ पर्यटक कुटुंबाने दोन प्लास्टिक बॅरलची खरेदी करून पाणी समस्येवर उपाय योजना केली.पाणी पुरवठा खात्याचा नळाद्वारे पुरवठा अत्यल्प होत असून, कधी- कधी चार दिवसांनी होणारा पुरवठा पाच दहा मिनिटांसाठी होत असतो,त्यामुळे दोन बॅरल्स खरेदी केल्याचे पर्यटक जिम यानी सांगितले.
दरम्यान,पाणी पुरवठा कमी प्रमाणात होण्याची अनेक कारणे असली तरी चांदेलहुन जादा पुरवठा होत नाही,हे प्रमुख कारण मानले जाते.दुसरे कारण म्हणजे, पाण्याची बूस्टर पंपाद्वारे होणारी लूट.ह्या लुटीची पाणी खात्याच्या वरिष्ठ व कनिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना आहे,मात्र उपाययोजना होत नाही,ह्याचे आश्चर्य वाटत असल्याचे मत विदेशी पर्यटकाने व्यक्त केले.
तरी पाणी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी याबाबत सखोल अभ्यास करावा व तुटवडा भासणार नाही ह्याची काळजी घ्यावी तसेच प्रलंबित सूचना,पंचायत ठराव व अन्य गोष्टींचा विचार करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे.