कुणाचाही जीव वाचवण्यासाठी तुम्हाला मेडिकलची डिग्री असायलाच हवी असे काही नाही, प्रत्येकाला माणुसकीची डिग्री असावी. प्रत्येकाने पुढाकार घेऊन रक्तदान करावे, रक्ताची भासणारी कमतरता मिटवण्यासाठी लाभ होईल. माणसाचं माणूसपण जपणं या कृतीतून शक्य आहे. रक्तदान ही फार मोठी चळवळ आहे त्यात सर्वानी सामील व्हावे.त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे प्रतिपादन शिक्षक, पत्रकार भावार्थ मांद्रेकर यांनी पेडणे येथे केले.
पेडणे रवळनाथ स्पोर्ट्स एन्ड कल्चरल क्लब , भगवती हायस्कुल आणि म्हापसा जिल्हा इस्पितळ, रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसऱ्या रक्तदान शिबिराचे प्रमुख पाहुणे या नात्याने यावेळी मांद्रेकर बोलत होते.
भगवती हायस्कुल संकुलात आयोजित या शिबिराच्या उदघाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून भावार्थ मांद्रेकर यांच्या सोबत भगवती हायस्कुलचे मुख्याध्यापक केशव पणशीकर, व्हायकाऊंट हायस्कुलचे मुख्याध्यापक राजेंद्र बोन्द्रे, समाजसेवक डॉ. राहुल सूर्यवंशी आणि रवळनाथ क्लबचे अध्यक्ष नरहरी पेडणेकर हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
……………………………………………….
३६ जणांचे स्वेच्छा रक्तदान
समाजसेवेचे व्रत घेऊन पेडणे शहरात प्रदीर्घ वैद्यकीय सेवा बजावलेल्या कै. डॉ. उषा खानोलकर आणि पेडणे तालुक्यात मराठी भाषेच्या वृद्धीसाठी आजन्म कार्यरत असलेले भगवती शिक्षण संस्थेचे चेअरमन कै. उत्तम कोटकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ या रक्तदान शिबिरात एकूण ३६ रक्तदात्यांनी स्वेच्छा रक्तदान केले.
…………………
कृपया बॉक्समध्ये घेणे / फोटो संदीप राणे / शेखर पार्सेकर
संदीप राणेंचे रक्तदानाचे अर्धशतक
तुये पेडणे येथील युवा उद्योजक संदीप राणे यांनी आजच्या शिबिरात आपल्या आयुष्यातील पन्नासाव्या वेळी रक्तदान करण्याचा बहुमान मिळवत त्याने रक्तदानाचे अर्धशतक झळकावले. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून विशेषतः तरुण तरुणींनी रक्तदानाच्या पवित्र कार्यात आपले योगदान देत लोकांचे प्राण वाचवण्याचे आवाहन राणे यांनी यावेळी केले.
पार्से येथील शेखर पार्सेकर यांनीही आज २५व्या वेळी रक्तदान करत युवा पिढीसमोर नवा आदर्श प्रस्थापित केला.
………………
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उदघाटन करण्यात आले. समीर कोरगावकर यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. कौशल पेडणेकर यांनी पाहुण्यांचा परिचय केला.
उदय गुरव, संकेत माडखोलकर, कौशल पेडणेकर, प्रतीक शेट्ये यांनी मान्यवरांना पुष्प प्रदान केले. तर नरहरी पेडणेकर यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक व शेवटी आभार प्रदर्शन केले.