म्हापसा व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षा सौ. शुभांगी वायंगणकर यांची भेट घेऊन बाजारपेठेतील वेगवेगळ्या समस्यांचे व मागण्यांचे निवेदन सादर केले.
योग्य स्वच्छतागृहे आणि स्वच्छता सुविधेच्या अभावाच्या मुद्द्यावर व्यापार्यांच्या शिष्टमंडळाने अध्यक्षा शुभांगी वायगंकर यांच्या निदर्शनास आणून दिले की, हॉटेल शांतादुर्गाजवळील सार्वजनिक स्वच्छतागृह आता काही वर्षांपासून पूर्णपणे खराब झाले असून, तातडीने दुरुस्ती आणि नूतनीकरणाची गरज आहे. मटकीबाजार येथील इतर स्वच्छतागृहाचीही अवस्था चांगली नसून बहुतांश वेळा पाण्याअभावी बंद अवस्थेत असल्याचेही शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले. योग्य स्वच्छतागृह व स्वच्छता सुविधेअभावी आजूबाजूचे व्यापारी कर्मचारी व सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले.
म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीपाद सावंत म्हणाले, “शौचालयाची सुविधा लवकरात लवकर कार्यान्वित करावी, अशी आमची विनंती आहे.”
मार्केटमधील रस्त्यांच्या दुरुस्तीच्या संदर्भात म्हापसा मार्केट असोसिएशनच्या शिष्टमंडळाने अध्यक्षांना सर्व अंतर्गत रस्त्यांची तातडीने दुरुस्ती व देखभाल करण्याची विनंती केली असून सर्व खड्डे बुजविण्याची गरज असल्याचेही नगराध्यक्षाना सांगण्यात आले, तसेच पावसाळ्यापूर्वी बाजारपेठेतील सर्व रस्त्यांचे हॉटमिक्सींग करावे असेही सावंत यांनी सांगितले.