काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचे सत्य शेवटी समाजाला मान्य करावेच लागले. ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटामुळे हे शक्य झाले. वर्ष 1990 च्या भयानक काळरात्रीनंतर तत्कालीन सरकार काश्मिरी हिंदूंसाठी काही करेल, असे वाटत होते; मात्र तसे काही घडले नाही आणि काश्मिरी हिंदूंसह महिलांवर होणारे अत्याचार चालूच राहिले. काश्मीरमधील मुसलमान पुरुषांसह मुसलमान महिलांनीही जिहादी आतंकवाद्यांना साहाय्य केले, म्हणूनच जिहाद्यांना काश्मिरी हिंदूंचा नरसंहार करणे सोपे झाले, असे धक्कादायक वास्तव जम्मू येथील साहित्यिक डॉ. क्षमा कौल यांनी मांडले. त्या हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘द कश्मीर फाइल्स’- हिंदू महिलांच्या मनावरील घाव !’ या ऑनलाईन विशेष संवादात बोलत होत्या.
या वेळी ‘द न्यू इंडियन’च्या संस्थापक-संपादक आरती टिक्कू म्हणाल्या की, 1990 च्या दशकात झालेले काश्मिरी हिंदूंच्या सामूहिक हत्याकांडाचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचे सत्य कोणी लपविले आणि ते पुढे येऊ दिले नाही, याचा शोध घेण्याची गरज आहे. याला सर्वपक्षीय राज्यकर्ते उत्तरदायी आहेत. वर्ष 1990 च्या काळात काश्मिरी हिंदू महिलांवर बलात्कार झाले. त्यांच्या हत्या करण्यात आल्या. हिंदूंनी स्वतःची ओळख विसरावी, अशा प्रकारे दहशत निर्माण करण्यात आली. इस्लामी आतंकवाद आणि काश्मिरी हिंदूंच्या हत्याकांडाचे वास्तव समोर येता कामा नये आणि सामूहिक आतंकवादाचा कारखाना असाच चालू राहावा, अशी इच्छा इस्लामी आतंकवादामुळे ज्यांचा फायदा होता, ते बाळगून होते.
‘पनून कश्मीर’च्या प्रा. शैलजा भारद्वाज म्हणाल्या की, काश्मिरी मुसलमान समाजाने कट्टर आतंकवाद्यांना आमंत्रण दिल्याने आणि त्यांना साहाय्य केल्याने वर्ष 1990 चा काश्मिरी हिंदूंचा नरसंहार करण्यात आला. याच वेळी ‘आझाद कश्मीर’च्या नावाखाली दिलेल्या घोषणांमध्ये आतंकवादी, ‘जे.के.एल्.एफ्.’ सारख्या उग्रवादी संघटना यांच्यासमवेत मुसलमान नागरिक सुद्धा सहभागी झाले होते. भारताच्या सैन्यदलाने त्या वेळी हस्तक्षेप केला नसता, तर काश्मीर भारतापासून वेगळा झाला असता. अजूनही भारताच्या सैन्यदलामुळेच काश्मीरवर भारताचे नियंत्रण आहे.