बार्देश तालुक्याची म्हापसा शहर हे राजधानी तसेच मध्यावर्ती ठिकाण आहे. शहरातील उपजिल्हाधिकारी व मामलेदार तसेच इतर कार्यालये बार्देश वासियांसाठी सर्व दृष्टीकोणातून सोयीस्कर आहे, पण म्हापशातील ही सरकारी कार्यालये पर्वरीत नेण्याचा घाट स्थानिक लोकप्रतिनिधींकडून घातला जात आहे, असा आरोप काँग्रेसचे उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विजय भिके यांनी प्रसिध्द पत्रकान्वये केला आहे.
पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी आपल्या मतदारसंघातील काही मोजक्या लोकांच्या मागणीनुसार तीन वर्षांपुर्वी महसूलमंत्री पदी असताना म्हापशातील मामलेदार व उपजिल्हाधिकारी ही महत्वाची सरकारी कार्यालये पर्वरी मध्ये नेण्याचा प्रयत्न चालविला होता. पणत्यांचे मंत्रीपद तत्कालिन सरकारने काढून घेतल्यानंतर ही कार्यालये स्तलांतरीत करण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नव्हता. पण आता ते पुन्हा सत्ताधारी पक्षाद्वारे आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी ही कार्यालये पर्वरीत नेण्याचा प्रयत्न चालविला असल्याची खात्रीदायक माहिती मिळाली आहे. पण हा त्यांचा प्रयत्न बार्देशवासी कदापी यशस्वी करू देणार नाही, असा विश्वास भिके यांनी व्यक्त केला आहे.
बार्देश तालुका हा एक नगरपालिका आणि 33 पंचायतीतून निर्माण झालेला आहे. अस्नोडा ते वेरे बेती आणि हणजूण शिवोली ते खोर्जुवे बिठ्ठोण पासून तालुक्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांतील भागातील लोकांना म्हापसा शहर हे सर्व दृष्टीकोणातून सोयीस्कर असे ठिकाण वाटत आहे. त्यामुळेच लोक रोजच्या विविध कामांसाठी म्हापशात ये जा करतात. त्या अनुषंगानेच सरकारने म्हापशात सर्व सरकारी कार्यालये थाटलेली आहेत.
या कार्यालयांमध्ये ये जा करण्यासाठी तालुक्यातील कोणत्याही भागातील लोकांना म्हापसा हे अडचणीचे ठिकाण वाटत नाही. पण ही कार्यालये पर्वरीमध्ये स्थलांतरीत केल्यास त्यांचा चार पाच मोजक्याच पंचायतींमधील लोकांना लाभ होईल. असे झाल्यास इतर पंचायतीं मधील लोकांवर तो अन्याय ठरेल.
आमदार खंवटे यांनी फक्त आपल्या मतदारसंघातील मोजक्याच लोकांचा विचार न करता आपण बार्देश तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहोत याची जाणीव ठेवावी व आपल्या मतदारसंघ वगळता बार्देशवासीयांच्या हिताचा विचार करावा. अन्यथा तालुक्यातील म्हापसा वगळता इतर पाच लोकप्रतिनिधीही सरकारे कार्यालये आपल्या मतदारसंघात नेण्याचा प्रयत्न करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत.
ही कार्यालये पर्वरीमध्ये स्तलांतरीत करण्याचा प्रयत्न न करता, आमदार खंवटे यांनी सरकारच्या माध्यमातून म्हापशातील विद्यमान सरकारी संकुल इमारतीच्या जागी नियोजित बहुमजली प्रकल्प मार्गी लावावी व बार्देशवासीयांना उत्तम सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना भिके यांनी केली आहे.