_*हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक*_
दिनांक : २७.०३.२०२२
_*शिरसई येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा*_
*हिंदु राष्ट्राची स्थापना करणे हाच हिंदूंच्या सर्व समस्यांवरील उपाय! – सौ. शुभा सावंत, हिंदु जनजागृती समिती*
शिरसई, २७ मार्च – काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर प्रकाश टाकणारा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहून हिंदू त्यांच्यावरील अत्याचाराविषयी आज जागृत झालेला आहे. गोव्यात सरकारने हा चित्रपट गोव्यात करमुक्त केल्याने काँग्रेसला पोटशूळ उठले आहे, तर ‘पाप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेने चित्रपटाच्या प्रसारणावर आळा घालण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘द काश्मीर फायल्स’ हा चित्रपट खोटा ठरवण्याचा प्रयत्न चालवला आहे. यांविषयी हिंदूंनी जागृत राहून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे. हिंदूंनी स्वत: धर्माचरण करून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कृतीशील झाले पाहिजे. हिंदु राष्ट्राची स्थापना करणे हाच हिंदूंच्या सर्व समस्यांवरील उपाय आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेमुळे राष्ट्रकल्याण आणि विश्वकल्याण होणारच आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. शुभा सावंत यांनी केले. हिंदु जनजागृती समितीने गोपाळकृष्ण नगर, शिरसई येथे २७ मार्च या दिवशी सायंकाळी आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत सौ. शुभा सावंत ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि त्यासाठी करायच्या प्रयत्नांची दिशा’ या विषयावर मार्गदर्शन करत होत्या.
सभेला श्री गणेशाचा श्लोक म्हणून प्रारंभ झाला. सौ. शुभा सावंत मार्गदर्शनात पुढे म्हणाल्या,‘‘भगवद्गीता’ हा हिंदूंचा पवित्र धर्मग्रंथ असून, हिंदु संस्कृतीचा गौरव वाढवणारा तो मानबिंदू आहे. बर्याचदा लहान आणि युवावस्थेतील मुले यांना भगवद्गीता वाचण्यास किंवा पाठ करण्यास सांगितले जाते; मात्र ‘त्यांना त्यांच्या सध्याच्या स्थितीला गीतेचा खरोखर किती उपयोग होईल’, याकडे लक्ष दिले जात नाही. वास्तविक मुलांना भगवद्गीता शिकवण्यापेक्षा साधना शिकवणे अधिक योग्य ठरते. हिंदूंवर आज विविध माध्यमांतून आघात होत आहे. हिंदूंना आज असहिष्णू ठरवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. राज्यघटनेत समानतेचे तत्त्व असले, तरी हिंदु धर्म शिकवण्यास आज प्रतिबंध आहे, तर अल्पसंख्यांकांना धार्मिक शिक्षणासाठी अनुदान दिले जाते. धर्मनिरपेक्षतेच्या नावावर अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण आणि बहुसंख्यांक हिंदूंवर अन्याय केला जात आहे. जगभरात ‘जिहाद’ने उच्छाद मांडलेला असल्याने हिंदूंनी त्याचा धोका ओळखून अखंड सावध राहिले पाहिजे. हिंदूंनी क्षमतेनुसार हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी योगदान दिले पाहिजे. आज विश्वशांतीसाठी भारताकडे, भारतीय संस्कृतीकडे, आध्यात्मिक ज्ञानाकडे अन् सनातन हिंदु धर्माकडे संपूर्ण जग आशेने बघत आहे. हिंदूंनी धर्माचरण आणि शौर्यजागरणही केले पाहिजे’’. सभेचे सूत्रसंचालन सौ. वनिता चिमूलकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. अरुण हळदणकर यांनी केले. हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे खास आकर्षण म्हणजे सभेच्या ठिकाणी फ्रँच पत्रकार श्री. फ्रांसओ गोतियो यांनी सिद्ध केलेले वर्ष १९९० मध्ये काश्मीरमध्ये झालेल्या हिंदूंच्या हत्याकांडाचे सचित्र प्रदर्शन लावण्यात आले होते.
आपला विश्वासू,
डॉ. मनोज सोलंकी,
*हिंदु जनजागृती समिती, संपर्क क्रमांक – ९३२६१०३२७८*