शस्त्रांपेक्षाही शब्दांचे सामर्थ्य अधिक असते. यदुनाथ थत्ते या महान साहित्यिकाने पत्रकारितेतील उत्तुंग भरारी मारताना ‘ज्योतसे ज्योत जलाते चलो’ ह्या काव्यपंक्तीनुसार समाजवादी विचार शब्दांद्वारे जनसामान्यांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या जन्म शताब्दी प्रित्यर्थ समाजोन्नती संघटनेने दोघांचा सत्कार सोहळा आयोजिला आहे. ही अभिनंदनीय गोष्ट असल्याचे मनोगत ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाळवे यांनी व्यक्त केले.
स्व. थत्ते यांनी दळणवळणाची कोणतीही साधने उपलब्ध नसताना त्यावेळी केलेली धडपड विसरुन चालणार नाही. आजच्या सत्कार मूर्तींनी आपल्या साहित्यनिर्मितीत उत्तुंग शिखर गाठावे, अशी अपेक्षा सुरेश वाळवे यांनी केली.
म्हापसा येथील तुलसीराम सभागृहात समाजोन्नती मंडळाने आयोजिलेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी या नात्याने ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नगरसेवक सुधीर कांदोळकर, मंडळाचे अध्यक्ष शंभूभाऊ बांदेकर, उपाध्यक्ष दामोदर कुडाळकर, सत्कारमूर्ती कमलाकार हुमरसकर व धु्रव कुडाळकर हे उपस्थित होते.
वाळवे म्हणाले की, यदुनाथ थत्ते यांनी डॉ. बाबा आमटे, साने गुरुजी यांचे विचार आपल्या लेखणीच्या सामर्थ्यावर घराघरात पोचवले. आजचे सत्कारमूर्तीही शब्दांच्या जोरावर समाजात क्रांती घडवण्याचे काम करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पत्रकार कमलाकार हुमरसकर व नाट्यलेखक आणि कलाकार धु्रव कुडाळकर यांचा सत्कार शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू प्रदान करुन सुरेश वाळवे यांच्या हस्ते करण्यात आला.
दरम्यान, स्वागत शंभूभाऊ बांदेकर यांनी केले. राजेश चव्हाण यांनी सत्कार मूर्तींचा परिचय करुन दिला. सूत्रसंचालन महेश चव्हाण यांनी केले. तर आभार दामोदर कुडाळकर यांनी केले.