म्हापसा शहरातील रस्त्यावरील निराधार बांधवाना पुनर्वसनासाठी मानवतेच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करून परत त्यांना चांगले जीवन मिळवून देण्याची इच्छा बाळगून जीवन आनंद ही संस्था म्हापशात कार्यरत आहे. या संस्थेची लोकांना माहिती व्हावी म्हणून जीवन आनंद या संस्थेने म्हापशातील इतर सामाजिक संस्थेच्या सहकार्याने दि.9 एप्रिल रोजी सायं.5 वा. म्हापसा शहरात रॅलीचे आयोजन केले आहे अशी माहिती डॉ. संतोष पाटकर यांनी दिली.
सारस्वत विद्यालयाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेला त्यांच्यासोबत जीवन आनंद संस्थेचे संदीप परब, डॉ. जयेश चुरी, अमेय वरेडकर आदी उपस्थित होते.
सदर रॅली म्हापसा सिम येथून सुरू होऊन वृंदावन हॉटेल कडून युनियन फार्मसी मार्गे म्हापसा अर्बन बँकेकडून परत गांधी चौकाला वळसा घालून चाचा नेहरू पार्क मध्ये विसर्जीत होईल. त्यानंतर जीवन आनंद संस्थेचे संदीप परब हे संस्थेच्या कार्याबद्दल माहिती देतील. या वेळी प्रमुख वक्ते म्हणून गुरु पावसकर हे मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती देण्यात आली.
या रॅली मध्ये सारस्वत विद्यालय संस्थेच्या शिक्षण संस्था, म्हापसा व्यापारी संघटना, रोटरी क्लब ऑफ गोमंतक, व रोट्रॅक क्लब ऑफ म्हापसा सहभागी होणार आहेत.जीवन आनंद संस्थेने पेडे, म्हापसा येथे निवारा गृह सुरू करून 18 महिला सध्या तेथे राहत असून त्यांच्या पुनर्व्हसनाची जबाबदारी जीवन आनंद संस्थेने घेतली आहे. म्हापसा शहरात एकही बांधव रस्त्यावर राहू नये म्हणून जीवन आनंद संस्था प्रयत्नरत आहे, म्हापसा शहर भिकारी मुक्त करण्याचा प्रयत्न असून रस्त्यावर बेवारशी अश्या अवस्थेत पडलेल्या निराधार लोकांना जीवन आनंद संस्था आधार देत आहे.या रॅली च्या माध्यमातून लोकांच्या मनात प्रेम आणी सेवा याची भावना निर्माण होऊन जीवन आनंद संस्थेला मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते मिळतील व लोकांचे सहकार्य लाभेल अशी अपेक्षा असल्याचे संदीप परब यांनी सांगितले
म्हापसा शहरातील खऱ्या भिकाऱ्यांचे पुनर्रवसन करण्यासाठी लोकांनी सहकार्य करावे, म्हापसा शहरात जोपर्यत निराधारांना आधार मिळत नाही तो पर्यत पायात चप्पल न घालण्याचा निर्धार संदीप परब यांनी केल्याचे डॉ. जयेश चुरी यांनी सांगितले.