इंधन आणि गॅसच्या वाढत्या किमती आणि महागाईवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याबद्दल गोव्यातील काँग्रेसने बुधवारी भारतीय जनता पक्षावर त्यांच्या 42 व्या स्थापना दिन साजरा करत असताना टिका केली आहे आणि भाजपच्या स्थानिक नेतृत्त्वाने महागाई कमी करण्यासाठी प्रधानमंत्र्यांना सांगावे असे म्हटले आहे.
“भाजपच्या स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या किमती कमी करण्याची मागणी केली पाहिजे. तसे केल्यास सिद्ध होईल की भाजपची स्थापना लोकांची सेवा करण्यासाठी झाली होती, लोकांना लुटण्यासाठी नाही.” असे काँग्रेस प्रदेश काँग्रेस समितीचे माध्यम अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले.
गोव्यात पेट्रोलचे दर ६० रुपयांच्या खाली ठेवण्याचे आश्वासन भाजपनेच दिले होते, मात्र काही वर्षांनी ते आश्वासन विसरले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
”डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढत असल्याने त्याचा परिणाम आता सर्वसामान्यांवर होत आहे. सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले आहेत. कुटुंबे त्रस्त आहेत, महिला त्रस्त आहेत. नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पातही अर्थखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी इंधनाच्या दराचा उल्लेख केलेला नाही. शेवटी लोकांना त्रास होत आहे आणि ते स्थापना दिवस साजरा करत आहेत.” असे पणजीकर म्हणाले.
लोकांच्या सेवेसाठी स्थापन झालेला पक्ष नेहमीच लोकांची काळजी करत असतो असे त्यांनी पुढे म्हटले. ” भाजपने ते लोकांसाठी आहेत की लुटण्यासाठी हे आता स्पष्ट करावे.” असे ते पुढे म्हणाले.