हणजूण किनाऱ्याजवळील जागा गोवा पर्यटन विकास महामंडळाने ताब्यात घेतली होती, समुद्राच्या बाजूला असलेली डोंगराच्या कडेची समुद्राच्या लाटामुळे झीज होत असल्याने सरकारने या ठिकाणी संरक्षक भिंत बांधून सिमेंटचे मोठे ठोकले पाण्यात टाकले. समुद्र किनाऱ्यावर जाण्यासाठी मातीची पायवाट ठेवली होती, पण पर्यटन खात्याने गेल्या दोन दिवसापासून या ठिकाणी सिमेंट काँक्रेटचे बांधकाम सुरू केल्याने ग्रामस्थांत संभ्रम निर्माण झाला आहे.
पर्यटन खात्याच्या या कामास स्थानिकांचा विरोध असून सदर काम बंद पाडण्यात येईल असा इशारा योगेश गोवेकर यांनी दिला. हणजूण व वागातोर किनारे पर्यटन खात्याने 33 वर्षांच्या करारावर खाजगी कंपनीस देऊन सरकारने गोवा विकावयास काढला आहे, दोन्ही किनाऱ्यांचे खाजगीकरण झाल्यास भविष्यात स्थानिकांना किनाऱ्यावर फिरणे सोडाच समुद्र किनाराही नजरेस पडणार नाही असा आरोप रवी हरमलकर यांनी केला.
दरम्यान वागातोर किनाऱ्यावरील जागेला खाजगी कंपनीने कुंपण घालून तात्पुरत्या बांधकामच्या नावाखाली लोखंडी बांधकाम सुरू केले आहे. काही दिवसापूर्वी वागातोर किनाऱ्यावर एका कार्यक्रमासाठी आमदार डिलायला लोबो आलेल्या असताना त्यांच्या निदर्शनास सदर बाब आणून दिल्यानंतर त्यांनी सदर कंपनीचा करार रद्द करण्यास सरकारला भाग पाडू असे सांगितले होते.