भक्ती आणि शक्ती यांचा सुरेख संगम : मारुति

.

 

*मनोजवम् मारुततुल्यवेगञ्, जितेन्द्रियम् बुद्धिमतां वरिष्ठम् ।।*
*वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणम् प्रपद्ये ।।*

*अर्थात् मनोवेगाने जाणारा, वाऱ्याप्रमाणे वेगवान, जितेंद्रिय, बुद्धिमानांमध्ये श्रेष्ठ, वायुपुत्र, वानरसमुदायाचा अधिपती आणि श्रीरामाचा दूत, अशा मारुतीला मी शरण आलो आहे.*

*मारुतीच्या अतुलनीय गुणवैशिष्ट्यांची ओळख या एका श्लोकावरून होते.*

*लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच जवळचा वाटणारा एक देव म्हणजे ‘मारुति’ ! मारुति हा सर्वशक्तिमान, महापराक्रमी, महाधैर्यवान, सर्वोत्कृष्ट भक्त व संगीतज्ञानमहंता म्हणूनही प्रसिद्ध आहे. जीवनाला परिपूर्ण करणारे जे जे आहे, त्या त्या सर्वांचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे मारुति. शक्‍ती, भक्‍ती, कला, चातुर्य आणि बुद्धीमत्ता यांनी श्रेष्ठ असूनही प्रभु रामचंद्रांच्या चरणी सदैव लीन रहाणार्‍या मारुतीच्या जन्माचा इतिहास आणि त्याची काही गुणवैशिष्ट्ये या लेखातून जाणून घेऊया.*

*जन्माचा इतिहास*
राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी ‘पुत्रकामेष्टी यज्ञ’ केला. तेव्हा यज्ञातून अग्निदेव प्रगट होऊन त्याने दशरथाच्या राण्यांसाठी पायस (खीर, यज्ञातील अवशिष्ट प्रसाद) प्रदान केला होता. दशरथाच्या राण्यांप्रमाणेच तपश्‍चर्या करणार्‍या अंजनीलाही पायस मिळाले होते आणि त्यामुळेच मारुतीचा जन्म झाला होता. त्या दिवशी चैत्रपौर्णिमा होती. तो दिवस ‘हनुमान जयंती’ म्हणून साजरा करतात. वाल्मीकिरामायणात (किष्किंधाकांड, सर्ग 66) पुढीलप्रमाणे हनुमानाची जन्मकथा दिली आहे – अंजनीच्या पोटी हनुमान जन्मला. जन्म झाल्यावर ‘उगवणारे सूर्यबिंब हे एखादे पक्व फळ असावे’, या समजुतीने हनुमानाने आकाशात उड्डाण करून त्याकडे झेप घेतली. त्या दिवशी पर्वतिथी असल्यामुळे सूर्याला गिळण्यासाठी राहु आला होता. सूर्याकडे झेपावणारा हनुमान हा दुसरा राहुच आहे, या समजुतीने इंद्राने त्याच्यावर वज्र फेकले. ते हनुवटीला लागून ती छाटली गेली. यावरून त्याला ‘हनुमान’ हे नाव पडले.

*1. कार्य व वैशिष्ट्ये*

सर्वशक्तिमान : सर्व देवतांमध्ये फक्त मारुतीला वाईट शक्ती त्रास देऊ शकत नाहीत. लंकेत लाखो राक्षस होते, तरीही ते मारुतीला काही करू शकले नाहीत. जन्मतःच मारुतीने सूर्याला गिळण्यासाठी उड्डाण केले अशी जी गोष्ट आहे, तीतून वायुपुत्र (वायुतत्त्वातून निर्माण झालेला) मारुति हा सूर्याला (तेजतत्त्वाला) जिंकणारा होता हे लक्षात येते. पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश या तत्त्वांत वायुतत्त्व हे तेजतत्त्वापेक्षा जास्त सूक्ष्म, म्हणजे जास्त शक्तिमान आहे.

भक्त : दास्यभक्तीचे एक सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणून अजूनही मारुतीच्या रामभक्तीचेच उदाहरण देतात. आपल्या प्रभूंकरिता प्राणार्पण करण्यासाठी तो सदैव तयार असे. त्यांच्या सेवेपुढे त्याला शिवतत्व व ब्रह्मत्व यांची इच्छाही कवडीमोल वाटत असे. हनुमान म्हणजे सेवक व सैनिक यांचे मिश्रण होय !

बुद्धिमान : व्याकरणसूत्रे, सूत्रवृत्ति, वार्तिक, भाष्य आणि संग्रह यांत मारुतीची बरोबरी करणारा कोणी नव्हता (उत्तररामचरित 36.44-46). मारुतीला अकरावा व्याकरणकार मानतात.

मानसशास्त्रात निपुण व राजकारणपटु : अनेक प्रसंगी सुग्रीवादि वानरच काय, पण रामानेही याचा सल्ला मानला आहे. रावणाला सोडून आलेल्या बिभीषणाला आपल्या पक्षात घेऊ नये, असे इतर सेनानींचे मत असता, मारुतीने ‘त्याला घ्यावे’ असे सांगितले व रामाने ते मान्य केले. लंकेत सीतेच्या प्रथम भेटीच्या वेळी तिच्या मनात स्वतःबद्दल विश्वास निर्माण करणे, शत्रुपक्षाला नामोहरम करण्यासाठी लंकादहन करणे, रामाच्या आगमनाबद्दल भरताला काय वाटते ते पहाण्यासाठी रामाने त्यालाच पाठविणे, यावरून त्याची बुद्धिमत्ता व मानसशास्त्रातील निपुणता दिसून येते. लंकादहनानेही त्याने रावणाच्या प्रजेचा रावणाच्या सामर्थ्यावरील विश्वास डळमळीत केला.

जितेंद्रिय : सीतेच्या शोधासाठी रावणाच्या अंतःपुरात गेलेल्या मारुतीची मनःस्थिति ही त्याच्या उच्च चारित्र्याची निदर्शक आहे. त्या वेळी तो स्वगत म्हणतो, ‘निःशंकपणे पडलेल्या या सर्व रावणस्त्रिया मी ह्या अशा पाहिल्या खऱ्या; परंतु त्या पहाण्यामुळे माझ्या मनामध्ये विकार उत्पन्न झाला नाही.’ – वाल्मीकिरामायण, सुंदरकांड 11.42-43.
अनेक संतांनीही या जितेंद्रिय अशा हनुमंताची पूजा बांधून त्याचा आदर्श समाजापुढे ठेवला. इंद्रियजित असल्यामुळेच मारुति इंद्रजितालासुद्धा हरवू शकला.

साहित्य, तत्त्वज्ञान व वक्तृत्वकला यांत प्रवीण : रावणाच्या दरबारातील त्याचे भाषण हा वक्तृत्वकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.

संगीतशास्त्राचा प्रवर्तक : मारुतीला संगीतशास्त्राचा एक प्रमुख प्रवर्तक मानलेले आहे. समर्थ रामदासस्वामींनी त्याला ‘संगीतज्ञानमहंता’ असे संबोधले आहे.

चिरंजीव : दर वेळी प्रभु श्रीराम अवतार घेतात तेव्हा ते तेच असतात, मात्र मारुति दर अवतारी निराळा असतो. मारुति सप्तचिरंजीवांपैकी एक असला, तरी सप्तचिरंजीव चार युगांचा शेवट झाला की मोक्षाला जातात व त्यांची जागा अतिशय उन्नत असे सात जण घेतात.

*2. मूर्तिविज्ञान*

अ. दासमारुति व वीरमारुति : हनुमानाची दासमारुति व वीरमारुति ही दोन रूपे आहेत. दासमारुति हा रामापुढे हात जोडून उभा असतो. त्याची शेपटी जमिनीवर रुळलेली असते. वीरमारुति युद्धाच्या पवित्र्यात असतो. त्याची शेपटी वर उभारलेली व उजवा हात मस्तकाकडे वळलेला असतो.

आ. पंचमुखी मारुति : पंचमुखी मारुतीच्या मूर्ती बऱ्याच प्रमाणात आढळून येतात. गरुड, वराह, हयग्रीव, सिंह व कपिमुख ही ती पाच मुखे होत. या दशभुज-मूर्तींच्या हातात ध्वज, खड्ग, पाश इत्यादि आयुधे असतात. पंचमुखी देवतांचा एक अर्थ असा आहे की, पूर्व, पश्चिम, दक्षिण व उत्तर या चार व उर्ध्वदिशा अशा पाचही दिशांना त्या देवतेचे लक्ष आहे किंवा तिचे त्यांच्यावर स्वामित्व आहे.

इ. दक्षिणमुखी मारुति : दक्षिण शब्द दोन अर्थांनी वापरला जातो. एक म्हणजे दक्षिण दिशा व दुसरा म्हणजे उजवी बाजू.
गणपति व मारुति यांची सुषुम्नानाडी नेहमी चालू असते; पण रूप बदलल्यावर थोडा बदल होऊन त्यांची सूर्य किंवा चंद्र नाडीही थोड्या प्रमाणात चालू होते.

*3. शनीची साडेसाती व मारुतीची पूजा :* शनीची साडेसाती असतांना तिचा त्रास कमी व्हावा म्हणून मारुतीची पूजा करतात.

*संदर्भ : सनातन संस्थेचा लघुग्रंथ ‘मारुति’*
*संकलन : श्री. तुळशीदास गांजेकर,*
*संपर्क : 9370958132*

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar