भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दूरदृष्टी असलेले, ध्येयाने झपाटलेले व्यक्तिमत्व होते. त्यांनी जी राज्यघटना लिहिली त्या घटनेवरून त्यांची दूरदृष्टी लक्षात येते असे प्रतिपादन मुख्याध्यापक श्री भगवान म्हामल यांनी केले .
माडेल थिवी येथील मांगिरीश कॉलनीत उदेंतें दर्पण तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली होती. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष या नात्याने ते बोलत होते.
सदर कार्यक्रम उदेंतें दर्पणचे पदाधिकारी श्री हरीश कामत यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता.
श्री हरीश कामत म्हणाले की आज डिजिटल युगात वावरत असतानाही जातीभेद ,वर्णभेद, धर्मभेद, लिंगभेद आदी पाळला जातो याचा खेद वाटतो. विविध भाषा, प्रांताचा आपला देश अखंडित ठेवण्यासाठी हा भेदाभेद विसरून आम्ही आर्थिक- सामाजिक समता, बंधुता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्यातील तथाकथित अनेक राजकीय पक्षही मताच्या राजकारणासाठी जातपातीचे, धर्माचे राजकारण करतात.हे सर्व बाजूला ठेवून आपण सर्वांनी संघटित होऊन देशसेवा, समाजसेवा केली पाहिजे असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व आंबेडकरांच्या तस्विरीला हार घालून करण्यात आली. तद्नंतर सगळ्यांनी ‘हीच आमुची प्रार्थना’ ही प्रार्थना म्हटली. श्री वामन धारवाडकर यांनी सूत्रसंचालन केले तर सौ. अभया कामत हिने सगळ्यांचे आभार मानले.